नाराज नंदा लोणकर, वर्षा तापकीर यांना `स्थायी`वर संधी : पुण्याची तिजोरी महिलांच्या हाती

...
नाराज नंदा लोणकर, वर्षा तापकीर यांना `स्थायी`वर संधी : पुण्याची तिजोरी महिलांच्या हाती

पुणे : पुणे महापालिकेची आगामी निवडणूक आणि नवी राजकीय समीकरणे जुळवत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने स्थायी समितीतील नव्या चारही जागांवर अनुभवी नगरसेविकांना संधी दिली आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसनेही हाच फॉर्म्युला वापरत आपल्या वाट्याच्या तीन जागांसाठी महिलांचीच निवड केली आहे. परिणामी, स्थायी समितीत आता महिलाराज राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

स्थायी समितीच्या नव्या सदस्यांची सर्वसाधारण सभेत सोमवारी निवड झाली. भाजपकडून नगरसेविका वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, उज्ज्वला जंगले आणि सुनीता गलांडे यांची वर्णी लागली. राष्ट्रवादीने नगरदसेविका नंदा लोणकर, अमृता बाबर यांना स्थायीच्या कारभारात लक्ष घालण्याची जबाबदारी दिली आहे. कॉंग्रेसने लता राजगुरु यांना संधी दिली आहे.

शिवसेनेकडून बाळा ओसवाल यांची निवड झाली आहे. स्थायी समितीच्या इतिहास पहिल्यांदाच इतक्‍या प्रमाणात महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने नंदा लोणकर नाराज झाल्या होत्या. राष्ट्रवादीने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे वर्षा तापकीर या महापौर पदासाठी आशावादी होत्या. अखेर त्यांना स्थायी समितीच्या सदस्य पदावर समाधान मानावे लागले आहे. स्थायी समितीत या आधी केवळ चार महिला होत्या. त्यांची संख्या आता दुप्पट झाली आहे.  

स्थायी समितीत 16 पैकी 10 भाजप, राष्ट्रवादी चार आणि कॉंग्रेस-शिवसेनेचा प्रत्येक एक सदस्य आहे. त्यापैकी दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने आठ सदस्यांची नव्याने निवड करण्यात आली. त्यात भाजप चार, राष्ट्रवादी दोन तर कॉंग्रेस-शिवसेनेच्या दोघांचा समावेश आहे. पुढील दोन वर्षात महापालिकेची निवडणूक होणार असल्याने स्थायीचे सदस्यपद पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांनी प्रयत्न चालविले होते. विशेषत: सत्ताधारी भाजपमध्ये चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेतील अत्यंत महत्वाच्या या समितीवर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे. दरम्यान, महापालिकेचे 2020-21 चा अर्थसंकल्प स्थायी समिती येत्या मंगळवारी (ता.25) मांडणार आहे. 

सत्ताधारी भाजपमध्ये जुन्यांसह नव्या नगरसेवकांनी स्थायीसाठी फिल्डिंग लावली होती. त्यासाठी जवळपास दोन डझन नगरसेवकांनी पक्षाकडे अर्ज करीत स्थायीचे सदस्यपद देण्याची मागणी लावून धरली होती. मात्र गेल्या तीन वर्षात ज्या कोणतेच पद मिळाले नाही, अशांना संधी देण्याची भूमिका पक्ष नेतृत्वाने घेतली होती. तरीही, काही नगरसेवकांनी आपल्यालाच प्राधान्य मिळावे, यासाठी नेत्यांकडे आग्रह धरला होता. त्यात काहींना संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर आळवला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com