ऐन उन्हाच्या कडाक्‍यात एसटीचा प्रवास होणार गारेगार!

या उन्हाळ्यातील प्रवासी संख्या लक्षात घेउन या वातानुकूलित प्रवासी गाड्या रस्त्यावर आणण्याची प्रक्रिया ही महामंडळाकडून पूर्ण करण्यात आली असून त्यासाठी खास शुभारंभ सोहळा मुंबई अथवा पुण्यात आयोजित केला जाणार आहे.
ऐन उन्हाच्या कडाक्‍यात एसटीचा प्रवास होणार गारेगार!

मुंबई - प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एप्रिल अखेरपर्यंत तब्बल 100 नवीन वातानुकूलित मल्टिअॅक्‍सल अश्‍वमेघ गाड्या रस्त्यावर उतरणार आहेत. पुणे-मुंबई, नाशिक-पुणे, औरंगाबाद-नागपूर आदी राज्यातील मुख्य शहरांसोबत हैदराबाद, बेंगलुरू या पररराज्यातील मुख्य शहरांतील प्रवाशांना ऐन उन्हाच्या कडाक्‍यात एसटीच्या या नवीन गाड्याचा गारेगार प्रवास अनुभवायला मिळणार आहे.

या उन्हाळ्यातील प्रवासी संख्या लक्षात घेउन या वातानुकूलित प्रवासी गाड्या रस्त्यावर आणण्याची प्रक्रिया ही महामंडळाकडून पूर्ण करण्यात आली असून त्यासाठी खास शुभारंभ सोहळा मुंबई अथवा पुण्यात आयोजित केला जाणार आहे.

तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाने या नवीन मल्टिएक्‍सल वातानुकूलित असलेल्या 100 बसेस या पूर्णपणे खासगी मालकांकडून निविदांच्या माध्यमातून भाडेकरारावर घेतल्या आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया ही महामंडळाकडून मागील वर्षी करण्यात आली होती. या सर्व बसेस या स्कॅनिया या कंपनीच्या असून त्या सेमी स्लीपर आहेत. या बसेसमध्ये 57 ते 45 सीट असून शिवनेरी या वातानुकूलित बसेसपेक्षा अनेक वेगळे बदल करून प्रवाशांना अधिकाधिक आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती महामंडळातील सूत्राकडून देण्यात आली.

या बसेसचे तिकिटदर अद्यापही महामंडळाकडून निश्‍चित करण्यात आलेले नसले तरी, ते इतर राज्यातील अशा प्रकारच्या बसेसप्रमाणे अथवा शिवनेरीच्या तिकिटदराने या बसेसचेही तिकिट दर ठेवले जाण्याची शक्‍यता आहे. मात्र यासंदर्भात अधिकाऱ्यांमध्ये दरासंदर्भात एकमत नसल्याने ऐनवेळी खासगी मालकांना खूष करण्यासाठी दर अधिकचे आकारले जाण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे.

या बसेस दादर-पुणे, पुणे-हैदराबाद, पुणे-बेंगलुरू, कोल्हापूर-पुणे, नागपूर-औरंगाबाद, नागपूर-पुणे आणि पुणे नाशिक या महामार्गावर चालविण्यात येणार आहेत. यातील काही महामार्गावर चालविण्यात येणाऱ्या वातानुकूलित शिवनेरी आदी बसेस या तोट्यात चालत असल्याने त्या बंद करण्यात आलेल्या आहेत, तर काही बसेस या इतर मार्गावर वळविण्यात आलेल्या आहेत. अशा स्थितीत महामंडळाकडून एप्रिल अखेरपर्यंत रस्त्यावर उतवल्या जाणाऱ्या या नवीन बसेसला प्रवाशी अधिकाधिक मिळतील कसे मिळतील असा प्रश्‍न महामंडळातील अनेकांपुढे उपस्थित राहिला आहे.

महामंडळाच्या आहेत, त्या बसेसची योग्य देखभाल करण्यासाठी यंत्रणा कमी पडत असून अशा स्थितील खासगी मालकांकडून चालविण्यात येणाऱ्या बसेसमुळे एसटीचे पूर्णपणे कंबरडे मोडले जाईल, अशी भितीही व्यक्‍त एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींकडून व्यक्‍त केली जात आहे.

एसटीच्या या नवीन बसेसच्या प्रक्रियेला महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांनी कडाडून विरोध दर्शविला होता. एसटीत खासगी मालकांच्या बसेसची एंट्री झाली तर त्यातून एसटी आपोआपच खासगी लोकांच्या ताब्यात जाईल, यामुळे अशा प्रकारच्या खासगी मालकांकडून बसेसची खरेदी करू नये अशी मागणी लावून धरण्यात आली होती. मात्र या मागणीला धुडकावून एसटीच्या ताफयात या नवीन बसेस या एप्रिलच्या अखेरपर्यंत आणल्या जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com