दहावीच्या विद्यार्थ्यांना आता अंतर्गत २० गुण मिळणार : आशिष शेलार  - SSC board will give 20 marks | Politics Marathi News - Sarkarnama

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता अंतर्गत २० गुण मिळणार : आशिष शेलार 

संजय मिस्कीन 
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "जलसुरक्षा" हा विषय देशाच्या पातळीवर हाती घेतला असल्याने व याचे महत्व विचारात घेऊन जलसुरक्षा हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात आला .

मुंबई : राज्‍य शिक्षण मंडळाच्या इयत्‍ता 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांनाही अंतर्गत 20 गुण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्‍याची महत्‍वपूर्ण घोषणा शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केली.

20 गुणांची पद्धत बंद केल्‍याने यंदा राज्‍य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या मुलांना फटका बसला होता. निकालातही 12 टक्‍क्‍यांची घसरण झाली होती. सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली. आता या निर्णयाचा फेरविचार करुन अंतर्गत 20 गुणांची पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यर्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

अंतर्गत गुण देताना गुणांची खिरापत वाटण्यात येते. त्‍यामुळे गुणवत्‍तेच्या नावाखाली हे अंतर्गत 20 गुण बंद करण्यात आले होते. राज्‍य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचे हे गुण बंद होत असताना सीबीएसई, आयसीएसई सारख्या बोर्डाने मात्र अंतर्गत गुण सुरू ठेवले आहेत.

त्यामुळे राज्‍य शिक्षण मंडळाने आपल्या धोरणाचा पुर्नविचार करण्याकरिता शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्‍थापन करण्यात आली होती. समितीच्या शिफारशींनुसार 9 वी व 10 करिता भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन 80 गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचे करण्यात आल्‍याची आशिष शेलार यांनी केली. ते मंत्रालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

जलसुरक्षेचा अभ्‍यासक्रमात समावेश

शैक्षणिक वर्ष 2019-20  पासून इ.11 वी साठी व शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून इ. 12 वी करिता अंतिम मूल्यमापन हे 650 ऐवजी 609 गुणांचे राहील. सद्यस्थितीतील पर्यावरण शास्त्र विषयास देण्यात येणाऱ्या 50 गुणांऐवजी प्राप्त गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करण्यात येईल तसेच पर्यावरण शास्त्र या विषयामध्ये जल सुरक्षा हा विषय नव्याने समाविष्ट राहील अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "जलसुरक्षा" हा विषय देशाच्या पातळीवर हाती घेतला असल्याने व याचे महत्व विचारात घेऊन जलसुरक्षा हा विषय नव्याने समाविष्ट करण्यात आला असून इ. 9 वी ते इ. 12 वीच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख