`आम्ही 162' इव्हेंटने राज्यपालांवर दबाव वाढला 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या 162 आमदारांचे एकत्रित शक्तिप्रदर्शन करून महाविकास आघाडीने राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्यावरील दबाव वाढविला आहे.
`आम्ही 162' इव्हेंटने राज्यपालांवर दबाव वाढला 

मुंबई : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या 162 आमदारांचे एकत्रित शक्तिप्रदर्शन करून महाविकास आघाडीने राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्यावरील दबाव वाढविला आहे. 

"ग्रॅंड हयात' हॉटेलमध्ये एका भव्य सोहळ्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्षांचे 162 आमदार सोमवारी सायंकाळी एकत्र जमलेले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांच्याकडे सर्व पक्षाचे आमदार व नेते येत होते आणि भेटत होते. सुप्रिया सुळे या आमदारांना भेटत होत्या, त्यांच्याशी गप्पा मारताना दिसत होत्या. जितेंद्र आव्हाड इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये बिझी होते. शेवटी त्यांनी आमदारांना शपथही दिली. 

आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या युवा नेत्यांची जोडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आदी नेते हजर होते तर कॉंग्रेस पक्षातर्फे मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान, नाना पटोले, प्रणिती शिंदे आदी नेते उपस्थित होते. 

शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे, संजय राऊत, दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर आणि अन्य नेते हजर होते. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे अबू आझमी हेदेखील हजर होते. 

राजकीय इतिहासात हे अभूतपूर्व चित्र होते. तीन पक्षांचे आमदार एकत्र आल्यानंतर सर्वांचेच मनोबल उंचावलेले दिसत होते. शरद पवार यांचे भाषण अत्यंत आक्रमक आणि तडाखेबंद झाले. भाजपच्या विरोधात सर्व पक्षांनी वज्रमुठ एकवटल्याचे चित्र या बैठकीतून दिसले. एखाद्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यासारखा हा सोहळा भासत होता. "आम्ही 162' चे पोस्टर्स भिंतींवर लागलेले होते. या सर्व आमदारांच्या एकजुटीचा आणि शक्तिप्रदर्शनाचे दडपण राज्यपालांवर नक्कीच आले असणार ! 

आमदारांना शपथ देण्याचा कार्यक्रम संपला तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले, की आता आमदारांनी आपापल्या बसमध्ये जाऊन बसावे, यावर एकच हशा उसळला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com