शिवसेनेचे खासदार कृपाल तुमानेंच्या `या' भूमिकेने रामटेककरांना आश्चर्याचा धक्का

खासदार कृपाल तुमाने व राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेना नेते आशीष जयस्वाल यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवसेनेचे खासदार कृपाल तुमानेंच्या `या' भूमिकेने रामटेककरांना आश्चर्याचा धक्का

रामटेक (जि. नागपूर) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणीटंचाईच्या आढावा बैठकीत शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला हाकलून लावल्यानंतरही तेथे उपस्थित असलेले खासदार कृपाल तुमाने व राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेना नेते आशीष जयस्वाल यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

रामटेक तालुक्‍याच्या पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी रामटेक येथे आढावा बैठक आयोजित केली होती. 

आढावा सभेत रामटेकच्या पाणीपुरवठ्याबाबत चर्चा सुरू होताच शिवसेनेचे नगरसेवक व रामटेक नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेता सुमित कोठारी यांनी गडमंदिरावरील पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. पन्नास लाख रूपये खर्चूनही गडमंदिरावर पाणी पोहोचलेच नाही. अनेक जलवाहिन्यांनी चाचणीतच `राम' म्हटले. 

सुमित कोठारी यांनी प्रश्‍न विचारायला सुरूवात केल्याबरोबर पालकमंत्री बावनकुळे यांचा पारा एकदम चढला. पालकमंत्री कोठारींवर एकदम भडकले. `तुम्ही बोलू नका', चला बाहेर व्हा, तुम्ही येथे कसे? तुम्हाला कोणी बोलावले?' असे बोलून `तुम्ही बाहेर जा' असे सुनावले. 

आम्हाला पत्र देऊन रितसर बोलावल्याचे सुमित कोठारी यांनी निदर्शनास आणून दिले. एवढ्यात पोलिस उपनिरिक्षकाने त्यांच्या हाताला धरून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुमित कोठारी यांनी पालकमंत्र्यांना चांगलेच सुनावले व सभात्याग केला. 

शिवसेनेच्या नेत्याचा व पदाधिकाऱ्याला सभागृहाबाहेर जाण्याचे निर्देश दिले तेव्हा सभागृहात शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने व राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार आशीष जयस्वाल उपस्थित होते. परंतु या दोन्ही नेत्यांनी मूग गिळून राहणे श्रेयस्कर मानले. या दोन्ही नेत्यांपैकी एकानेही सुमित कोठारी यांना अपमानास्पद वागणूक देताना आक्षेप घेतला नाही. या दोन्ही नेत्यांच्या बोटचेपे भूमिकेमुळे रामटेक येथील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. या दोन्ही नेत्यांचा स्वाभिमान कुठे आहे, अशी विचारणा आता शिवसैनिक करू लागले आहे. 

रामटेक नगर परिषदेच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सुमित कोठारी यांनी मुख्याधिकाऱ्याची बाजू घेतल्याने त्यांना सभेतून बाहेर काढण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com