split between vidura navale and ashok mohol | Sarkarnama

माजी खासदार नाना नवले आणि अण्णा मोहोळ जोडी फुटली!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

माजी खासदार विदुरा (नाना) नवले आणि अशोक (अण्णा) मोहोळ हे संत तुकाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मोहोळ यांचे पूत्र संग्राम यांना नवले यांच्या पॅनेलमध्ये स्थान न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे.  

पुणे : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी खासदार अशोक मोहोळ यांचे पुत्र संग्राम यांनी बंडखोरी केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष, माजी खासदार विदुरा नवले हे सहकारमहर्षी (कै.) मामासाहेब मोहोळ यांचे मानसपुत्र आहे. अशोक मोहोळ यांना राजकारणात संधी मिळावी यासाठी नवले यांनी त्याकाळात त्यागाची भूमिका बजावली होती. परंतु यावेळच्या कारखान्याच्या निवडणुकीत मात्र बालहट्टापायी मोहोळ यांनी बंडाचे निशाण उभारले आहे. मोहोळांना बालहट्ट भोवणार की मानसपुत्राचा पॅनल विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मामासाहेब मोहोळ यांनी सहकार आणि समाजकारण आणि कुस्ती यांच्या माध्यमातून मुळशी तालुक्याला पुणे जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र बनविले होते. जिल्ह्याचे राजकारण मुळशीतून शिजले जात होते. त्याकाळात राजकारणात नव्याने पाऊल टाकलेल्या विदुरा नवले यांची तळमळ, धडपड पाहून मामासाहेबांनी त्यांना मानसपुत्र केले. शरद पवार आणि नवले यांचीही महाविद्यालयीन जीवनापासून घनिष्ट मैत्री. नानांच्या तालुक्याविषयी असलेल्या आस्थेमुळेच पवार यांनी त्यांना राजकारणात ओढून अनेक संधी दिल्या.

त्याचवेळी मामासाहेबांचे पुत्र अशोक मोहोळ हे राजकारणात सक्रिय होते. अशोक मोहोळ यांना राजकारणात विविध पदावर संधी मिळावी यासाठी नवले यांनी एक पाऊल मागे येत त्याग स्विकारला. तेव्हापासून मोहोळ - नवले ही जोडी केवळ मुळशीतच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

एकेकाळी केवळ भाताचे आगार असलेल्या परिसरात विदूरा नवले यांनी मुळशी, मावळमधील शेतकर्‍यांसाठी 1996 साली त्यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. अशोक मोहोळही काही काळ या कारखान्याचे संस्थापक संचालक होते. कारखान्याबाबत नवले यांनी राजकारणात सर्वच पक्षांशी सख्य निर्माण केले.

कॉंग्रेसमध्ये असले तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यांशी घनिष्ठ  संबंध आहेत. त्यामुळे कारखान्याच्या उभारणीपासून ते ऊस उत्पादनात देशात प्रथम क्रमांकाचा कळस गाठेपर्यंत प्रत्येक ठिकाणी शरद पवार, अजित पवार यांची कृपादृष्टी लाभली आहे. शेतकर्‍यांना आर्थिक ताकद देण्याचे हित समोर ठेवून तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील राज्यातील श्रेष्ठींच्या मर्जी राखत नवले यांनी 1996 पासून आजतागायत संचालकांच्या बिनविरोध निवडणुका केल्या. प्रत्येकवेळी नियुक्त संचालकांनीही विदूरा नवलेंच्या अध्यक्षपदाला पंसती दिली.

मुळशी, मावळ, खेड, शिरूर, हवेली या पाच तालुक्यात संत तुकाराम साखर कारखान्याचा विस्तार आहे. या कारखान्यात एकूण 21 हजार सभासद आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणूकीचा अपवाद वगळता तीस वर्षात कारखान्याचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले होते. यावेळी 248 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यात नवले, मोहोळ, रमेशचंद्र ढमाले यांच्या पुत्रांनीही उमेदवारी मागितली होती. या वेळी कारखाऩ्यात घराणेशाही नको या मागणीने जोर धरला. संचालक मंडळ निवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. या निवड समितीत नवले यांच्याबरोबर अशोक मोहोळ तसेच पाचही तालुक्यांतील विविध पक्षांचे पदाधिकारी होते. सर्वांनी अजितदादा जी नावे निश्चित करतील त्यास सहमती दर्शविली. पवार यांनी सर्वपक्षीय नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी नावे निश्चित केली.

अशोक मोहोळ यांचे पुत्र संग्राम यांनी मात्र बालहट्ट सोडला नाही. पित्यानेही त्यांना माघारीसाठी गळ घातली नाही. त्यामुळे पौड - पिरंगुट गटात दिलीप दगडे, अंकुश उभे, महादेव दुडे या पॅनलच्या उमेदवाराबरोबर केवळ संग्राम मोहोळ यांनी बंडखोरी केली. तर वेळेत अर्ज माघारी घेता न आल्याने हिंजवडी - ताथवडे गटात पांडूरंग राक्षे यांनी पॅनलला जाहीर पाठींबा दिला. त्यामुळे या गटात विदूरा नवले, बाळासाहेब बावकर, तुकाराम विनोदे यांच्या मतदानाबाबत केवळ औपचारिकता बाकी आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव - वडगाव गटात बापूसाहेब भेगडे, ज्ञानेश्वर दाभाडे, शिवाजी पवार या पॅऩलच्या उमेदवारांविरोधात बाळासाहेब नेवाळे, तुकाराम नाणेकर यांनी बंडाचे निशाण फुंकले आहे. या गटात पंढरीनाथ ढोरे यांनी नवलेंच्या पॅनलला पाठींबा दिलाय. सोमाटणे - पवनानगर गटात नरेंद्र ठाकर, सुभाष राक्षे, शामराव राक्षे हे बिनविरोध निवडून आले आहेत. खेड-शिरूर- हवेली गटात प्रविण काळजे, मधुकर भोंडवे, दिनेश मोहीते, अनिल लोखंडे हे नवले यांच्या पॅनलचे उमेदवार असून अरूण लिंभोरे यांनी बंडखोरी केली आहे. महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी ताराबाई सोनवणे, शुभांगी गायकवाड, रूपाली दाभाडे या रिंगणात असून दाभाडे यांनी बंडखोरी केली आहे.

भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या गटात नवले यांच्या पॅनलचे उमेदवार बाळकृष्ण कोळेकर यांच्या विरोधात सुरेश जाधव यांनी दंड थोपटले आहे. तर शिवाजी कोळेकर यांनी बाळकृष्ण कोळेकर यांना पाठींबा दिला आहे. इतर मागासवर्ग प्रतिनिधीमध्ये पॅनलचे चेतन भुजबळ यांच्या विरोधात अरूण लिंभोरे हे रिंगणात आहेत. अनुसूचित जाती, जमाती गटात बाळू गायकवाड यांच्या विरोधात सखाराम गायकवाड उभे ठाकले आहेत.

सध्याचे एकंदर चित्र पाहता पाचही तालुक्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा यांनी नवले यांच्या सर्वपक्षीय पॅनलला जाहीर पाठींबा दिल्याने ही निवडणूक एकतर्फी होणार हे निश्चित झाले आहे. परंतू बालहट्टामुळे माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या भविष्यातील प्रतिष्ठेबद्दल मात्र प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. त्यामुळे मुळशी तालुक्यात मामासाहेबांच्या पुत्राचा बालहट्ट चालणार की मानसपुत्राचा पॅनेल विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख