जयंतरावांच्या गुदगुल्या आणि ओरखडे!

...
speech style by jayant patil
speech style by jayant patil

इस्लामपूर : राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपली भाषणाची वेगळी शैली विकसित केली आहे. ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे वरच्या आवाजात बोलत नाहीत. अजित पवार यांच्याप्रमाणे पाल्हाळिकपणा त्यांच्याकडे नसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे ते भावनात्मक मुद्यावर जास्त भर देत नाहीत. विरोधकावर थेट, कडवट आणि कठोर टीका करण्याऐवजी शालजोडीतले मारण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्या या भाषणशैलीचे मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केले.

इस्लामपुरात म्हणजे खुद्द जयंत पाटलांच्या होम पीचवर बोलताना ठाकरे यांनी जयंतरावांच्या भाषणाचे वर्णन केले. ते म्हणाले, ``मी सभागृहात जयंतरावांचे भाषण नेहमी काळजीपुर्वक ऐकतो. भाषणात ते गुदगुल्या करतात असे त्यांना वाटते. मात्र त्यांनी केलेल्या गुदगुल्या या गुदगुल्या नसून ते ओरखडे असल्याचे त्यांना रात्री घरी गेल्यावर लक्षात येते. नेमक्‍या ठिकाणी ओरखडे ओढण्याचे कसब जयंतरावांकडे आहे.`` जयंतरावांचे सर्व उपक्रम हे स्वतःसाठी नाहीत तर जनतेसाठी असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आज मी घेतला असेही ते म्हणाले.

न बोलता कार्यक्रम करणारे जयंतराव
मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाषणात जयंत पाटील यांच्यावर कडी केली. ते म्हणाले, "" जयंत पाटील यांनी भाऊ म्हणून मला नेहमी सहकार्य केले आहे. न बोलता कोणचा कार्यक्रम करायचा असेल तर त्या बाबतीत जयंतरावांचा आदर्श घेतला पाहिजे.''

जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्‍याचा ऐतिहासिक वारसा सांगितला, त्यानंतर ते म्हणाले, "" शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा क्रांतीकारी निर्णय सरकारने घेतला. मागच्या सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या हिताची जपणूक होत नव्हती म्हणून आमच्या सरकारला जनतेचा कौल मिळाला. टायर बदलेपर्यंत आमचे सरकार पडेल अशी टीका आमच्यावर होत असली तरी आमचे टायर रबरी नसून लोखंडी आहे, ते बदलण्याची गरज नाही, हे मुश्रीफांचे प्रत्युत्तर योग्य आहे. उध्दव ठाकरे जनहिताला प्राधान्य देऊन काम करणारे व दिल्या शब्दाला जागणारे नेते आहेत. कमी वेळेत त्यांनी प्रशासनावर चांगली पकड घेतली आहे. राज्यातील उद्योजकांना एकत्र करुन काहीही झाले तरी गुंतवणूक महाराष्ट्रातच करा, आम्ही सगळी ताकद देऊ असा दिलासा दिला आहे. राज्यातील बेकारीच्या गंभीर प्रश्‍नावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.'' ते म्हणाले, ""1984 ला या तालुक्‍यातील दोन तृतियांश जमीन पाण्याखाली नव्हती. ती जमीन पाण्याखाली आणण्यासाठी व जलसिंचन योजना राबवण्यासाठी मी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले. ते काम मी माझ्या आयुष्यात सर्वात मोठे मानतो. त्यामुळेच आज वाळवा तालुका राज्यात सर्वात जास्त महसूल भरणारा, 100 टक्के कर्ज वसुली देणारा तालुका म्हणून ओळखला जातो.''
 

इस्लामपूर येथील 14 कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या नुतन तहसील कार्यालयाच्या इमारत उद्‌घाटन सोहळा नुकताच पार पडला. राजारामबापूंची दुर्मिळ छायाचित्रे असलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "" शेतकरी मर मर मरतो, कष्ट करतो पण तरीही त्याला दाम मिळत नसेल तर त्याने काय करावे? महापुराच्या त्सुनामीत आभाळ फाटले, घरे वाहून गेली. प्रचंड नुकसान झाले. सरकार तेव्हाही होते आणि आताही आहे. सरकारची पालकत्वाची भुमिका असते. राज्याचे जसे सरकार असते तसेच देशाचेही असते. केंद्र सरकार मात्र पालकत्वाची भुमिका पाळताना दिसत नाही. लोकसभेला शिवसेनेची भाजपशी युती होती. आमच्या मदतीने केंद्रात त्यांचे सरकार आले. राज्यात दुर्दैवाने युती तुटली. मात्र जनतेसाठी आम्ही मदत मागत असताना केंद्र सरकार जाणिवपुर्वक दुजाभाव करत आहे. कष्टाने हक्काने मिळवण्याची आमच्या मनगटात ताकद आहे. आम्ही ते मिळवू. देशाचा औद्योगिक चेहरा असणारे उद्योजक महाराष्ट्रात आहेत ही गौरवाची बाब आहे. त्यांना इतर राज्याकडून अमिषे दाखवली जातात. मात्र काहीच दिले जात नाही. महाराष्ट्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात जसा शेतकरी सुधारला पाहिजे तसचा शहरी भागात रोजगार निर्माण करण्यासाठी उद्योग वाढलेच पाहिजेत. शिकलेल्यांनी काय करायचे हा मोठा प्रश्‍न आहे. अर्थव्यवस्था कोमात गेल्याचे अर्थतज्ञ सांगत आहेत. हे कुणामुळे झाले ? असे असताना हातावर हात ठेवून बसायचे काय? त्याला बाहेर काढण्यासाठी हे सरकार मदत करेल. या आधीच्या सरकारने उद्योजकांशी अशी बैठकच घेतली नव्हती हे दुर्दैव आहे. ज्यांच्यावर रोजगार अवलंबून आहे त्या उद्योगाला मदत करण्याची आमची भुमिका आहे. उद्योग चालले तर शिक्षीत झालेल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल. अलिकडे अनेक मुले बेरोजगार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसारखीच उद्योगांनाही चालना द्यायला हवी.''
कर्जमाफी विषयी ते म्हणाले, "" कर्जमाफीचा आम्ही दिलेला शब्द खरा करु. दोन लाखापर्यंत माफी आहेच; परंतू नियमीत कर्जदारांसह दोन लाखांच्यावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देऊ. जे जास्त अडचणीत आहेत अगोदर त्यांना दिलासा देऊन मग इतर शेतकऱ्यांबाबत निर्णय घेऊ. ही फक्त घोषणा नाही, आमचा शब्द आहे.

तहसील कार्यालयाविषयी ते म्हणाले, "" तहसील इमारत इतकी अद्यावत असू शकते याचे आश्‍चर्य आहे. देशात अशी इमारत नसेल. आता तिचा वापर कसा करणार हे जनतेच्या हातात आहे. सरकार येते-जाते, मात्र मालक असणारी जनता इथेच असते. अभिमान वाटेल अशी वास्तू ठेवा. आपल्या चांगल्या कारभारातून अधिकाऱ्यांनी जनतेचे आशिर्वाद मिळवावेत. याच जागी पुर्वी कडुनिंबाचे झाड होते. पंचक्रोशीतील जनतेला ते झाड जशी सावली देत होते तसेच सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम या पुढच्या काळातही अधिकाऱ्यांनी ताठ न वागता करावे.''


जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, राजारामबापू बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सभापती शुभांगी पाटील, कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, संग्राम पाटील, छायाताई पाटील, अविनाश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी स्वागत केले. प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com