चंद्रकांतदादांची 'विशेष जबाबदारी' गिरीश बापटांवर : कोथरूडमध्ये `डॅमेज कंट्रोल`

चंद्रकांतदादांची 'विशेष जबाबदारी' गिरीश बापटांवर : कोथरूडमध्ये `डॅमेज कंट्रोल`

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेवारीमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या कोथरुड विधानसभा मतदार संघाची 'विशेष जबाबदारी' खासदार गिरीश बापट यांना दिली गेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर बापटांना या संदर्भातील पत्र दिले गेले आहे. त्यामुळे आपसुकच जबाबदारी आलेल्या कसब्यासह कोथरुडचा गड बापटांना मताधिक्याने राखावा लागणार आहे.

कोथरुड विधानसभा मतदारसंघात घडणाऱ्या विविध घडामोडींमुळे दररोज या मतदारसंघाची चर्चा राज्यभर होत आहे. चंद्रकांतदादांना अगदी ऐनवेळी कोथरूडच्या मैदानात उतरावे लागले असले, तरी आधी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी, त्यानंतर ब्राम्हण महासंघाने चंद्रकांतदादांविरोधात घेतलेली भूमिका आणि चंद्रकांतदादांना विरोध करणारे लागलेले बॅनर यामुळे सगळीकडे फक्त कोथरुडचीच चर्चा आहे.

मात्र हळूहळू 'डॅमेज कंट्रोल' करत प्रचार रुळावर आणण्यासाठी चंद्रकांतदादांचे प्रयत्न सुरू आहेत. एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य लोकसभा निवडणुकीत भाजपला कोथरुडमधून मिळाले असले तरी चंद्रकांत पाटील हे जास्तीत जास्त मतदारांसह प्रभावी व्यक्तिमत्त्वांचा भेटीगाठी घेत आहेत. मात्र पक्षाने आता अधिकृतपणे बापट यांच्यावर कोथरुडची विशेष जबाबदारी दिल्याने चंद्रकांतदादांना राज्यभर आणखी लक्ष घालता येणार आहे.

पाचवेळा निवडणूक जिंकत बापट यांनी कसबा हा भाजपचा बालेकिल्ला बनवला आहे. कसब्याची राजकीय नस पक्की माहिती असलेल्या बापट यांच्यावर यंदा कसब्यातून उमेदवार असलेल्या महापौर मुक्ता टिळक यांच्या विजयाची जबाबदारी आपसूकच आली आहे. त्यातच नव्याने कोथरूडची जबाबदारी मिळाल्याने कसबा आणि कोथरूडची जबाबदारी बापट यांच्याकडेच आहे. माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे अपक्ष लढणार असल्याची चर्चा होती. मात्र बापट यांच्या मध्यस्थीनेच हे संभाव्य बंड शमले गेले. इतकेच नाहीतर मोकाटे हेही चंद्रकांतदादांच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत.

दोन्ही स्पर्धक उमेदवार चंद्रकांतदादांच्याच गाडीत !

कोथरूडसाठी इच्छुक असलेल्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि स्थायीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. मात्र केंद्रीय पातळीवर ऐनवेळी झालेल्या निर्णयामुळे चंद्रकांतदादांना कोथरुडमधून रिंगणात उतरावे लागले. मात्र हे दोन्ही स्पर्धक आता चंद्रकांतदादांच्या गाडीत प्रचारकामात सहभागी झाले आहेत. थेट नागरिकांशी संवादाबरोबरच कोथरुडमधील प्रभावी व्यक्तिमत्वांच्या भेटीगाठी चंद्रकांतदादा घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com