कामाला लावणाऱ्यांनाच कामाला लावू : SP संदीप पाटील

कामाला लावणाऱ्यांनाच कामाला लावू : SP संदीप पाटील

नारायणगाव : गणेशोत्सव मिरवणुकीत डीजे व डॉल्बीचा वापर करणारे मंडळांचे पदाधिकारी व वाद्यमालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. गुन्हा दाखल असलेल्या मंडळाला उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असा इशारा पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला.

पाटील एवढ्यावरच थांबले नाही तर पोलिसांना विनाकारण कामाला लावणाऱ्यांना कामाला लावण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.  

नारायणगाव पोलिस ठाण्याच्या वतीने रविवारी दुपारी गणेश उत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलिस पाटील, ग्रामसुरक्षारक्षक दल, शांतता समितीचे सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलिस अधीक्षक पाटील बोलत होते. उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना, सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड, सरपंच योगेश पाटे उपस्थित होते. 


संदीप पाटील म्हणाले, ""गणेशोत्सव हा सामाजिक बांधीलकी जपणारा, सहकुटुंब साजरा करण्यात येणारा आनंददायी उत्सव आहे. गणेशोत्सव मंडळांनी अवास्तव खर्चात बचत करून शिल्लक निधीचा वापर आपल्या गावाच्या विकासासाठी व परिसरातील समस्या सोडवण्यासाठी करावा. गावाच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी, गरीब रुग्णांच्या उपचारासाठी मदत करावी. दोन तासांच्या आनंदासाठी डीजे व डॉल्बीचा वापर करून आयुष्य खराब करू नका. रात्री बारा वाजण्यापूर्वी गणेश विसर्जन करा.''

``पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या गावांचे सरपंच यांनी ग्रामसुरक्षारक्षक दलाची स्थापना करून वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी पोलिसांना मदत करावी. पोलिस पाटलांनी प्रत्येक गावात दलाची स्थापना करावी. ग्रामसुरक्षादल, शांतता समितीचे सदस्य, तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गाव गुन्हेमुक्त करून शांतता प्रस्थापित करावी. कार्यतत्पर ग्रामसुरक्षारक्षकांना शस्त्रपरवाना दिला जाईल. पन्नासपेक्षा जास्त ग्रामसुरक्षारक्षक असलेल्या गावच्या पोलिस पाटलांना पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल,`` असे त्यांनी जाहीर केले. 
एच. पी. नरसुडे यांनी सूत्रसंचालन केले. गोरड यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com