sp sandip patil pacifies sonwane and benke | Sarkarnama

आमदार शरद सोनवणे व बेनके यांच्या बाचाबाचीत एसपी संदीप पाटलांची मध्यस्थी 

रवींद्र पाटे
मंगळवार, 31 जुलै 2018

नारायणगाव : मराठा समाजाचे जुन्नरमध्ये एक आॅगस्ट रोजी होणारे आंदोलन शांततेत व्हावे यासाठी बोलविलेल्या बैठकीतच आमदार शरद सोनवणे आणि अमित बेनके यांच्यात बाचाबाची झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने अखेरीस त्यांनीच यात मध्यस्थी करत दोघांतील वाद मिटवला.

नारायणगाव : मराठा समाजाचे जुन्नरमध्ये एक आॅगस्ट रोजी होणारे आंदोलन शांततेत व्हावे यासाठी बोलविलेल्या बैठकीतच आमदार शरद सोनवणे आणि अमित बेनके यांच्यात बाचाबाची झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने अखेरीस त्यांनीच यात मध्यस्थी करत दोघांतील वाद मिटवला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा संघाच्या वतीने बुधवारी(ता.1) जुन्नर तालुका बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा संघाचे कार्यकर्ते, शांतता कमिटीचे सदस्य यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोलिस अधीक्षक पाटील यांच्या उपस्थितीत आज दुपारी नारायणगाव पोलिस ठाण्यात बैठक झाली.

या बैठकीला आमदार शरद सोनवणे, उपविभागीय अधिकारी अजय पाटील, पोलिस उपविभागीय अधिकारी दीपाली खन्ना, तहसीलदार किरण काकडे, सकल मराठा संघाचे जिल्हा समन्वयक रमेश हांडे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनील ढोबळे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीची वेळ सकाळी साडे अकराची होती. अधीक्षक संदीप पाटील हे बाराच्या सुमारास आले. त्यानंतर आमदार सोनवणे आले. सोनवणे हे थेट पोलिस ठाण्यात गेले आणि पाटील यांच्याशी चर्चा करत बसले. त्यामुळे बैठकीला आणखी उशीर झाला.  बैठकीसाठी वेळेवर आलेले कार्यकर्ते यामुळे संतप्त झाले. काही जण निघून दाऊ लागले. हे समजताच सोनवणे व पाटील हे बाहेर आले. या वेळी अमिक बेनके व संतोष खैरे यांनी विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. आमच्या वेळेला काही महत्त्व आहे की नाही, अशा आशयाची त्यांनी तक्रार केली. आम्हाला मग बैठकीसाठी बोलवलेच कशाला, असा सवाल त्यांनी केला. यावर सोनवणे यांनी बैठकीला तुम्ही वेगळे वळण देत असल्याचा आरोप दोघांवर केला. त्यामुळे शब्दाने शब्द वाढला. अखेर पाटील यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला.

या वेळी आंदोलनकर्त्यांना पाटील यांनी सूचना दिल्या. मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी आंदोलकांनी घ्यावी. पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतुकीस अडथळा करू नये. कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, .असा इशारा त्यांनी दिला. चाकण येथे झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी आंदोलकांनी घ्यावी, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आंदोलकांना सुनावले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख