पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटलांनी केले पाच ठाण्याचे "स्टिंग'

वीरगाव, खुलताबाद ठाणे अंमलदारांना ठोठावला पाच हजारांचा दंड
mokshda patil, ips
mokshda patil, ips

औरंगाबाद : पोलिस ठाण्यात तक्रारदाराला कशी वागणूक मिळते, हे पाहण्यासाठी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी डमी तक्रारदारांमार्फत एकाच वेळी जिल्ह्यातील सिल्लोड शहर, गंगापूर, पैठण, वीरगाव आणि खुलताबाद पोलिस ठाण्यांचे स्टिंग ऑपरेशन केले.

त्यापैकी वीरगाव आणि खुलताबाद पोलिस ठाण्यात कर्तव्यात कसूर करणाऱ्या ठाणे अंमलदारांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावत समक्ष हजर होऊन खुलासा करण्याचे आदेश श्रीमती पाटील यांनी दिले.

सिल्लोड शहर, गंगापूर, पैठण आणि वीरगाव पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीला गेला आहे, अशा प्रकारची तक्रार घेऊन डमी तक्रारदाराला पाठवण्यात आले होते. यापैकी सिल्लोड आणि गंगापूर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. पैठण पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आएमईआय क्रमांक घेऊन तत्काळ सायबर पोलिस ठाण्याला कळवला; मात्र वीरगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने फक्त तक्रार अर्ज ठेवून घेत कोणतीही कारवाई त्यावर केली नाही.

खुलताबाद पोलिस ठाण्यात महिला तक्रारदाराला पाठवण्यात आले होते. या महिलेने खुलताबाद बसस्टॅंडवर आपली छेडछाड झाल्याची माहिती देत तक्रार दाखल करण्याची विनंती केली. यावेळी संबंधित ठाणे अंमलदाराने तक्रार न घेता या महिलेला स्वहस्ताक्षरात तक्रार अर्ज देण्यास सांगितले. हा अर्ज ठाणे अंमलदाराने ठेवून घेतला. आम्ही चौकशी करू. तुम्हाला काही होणार नाही असे सांगत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीची मागणी केली असता छोट्या-छोट्या तक्रारी कशाला साहेबांना सांगता, आम्ही पाहून घेऊ, तुम्ही घरी जा, असे सांगत पोलिस ठाण्याच्या वाहनामध्ये बसवून बसस्टॉपवर सोडून बसमध्ये बसवून दिले.

चांगल्याचे कौतुक; कसूर करणाऱ्यांना दंड
या प्रकरणाची पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी गंभीर दखल घेत वीरगावचे ठाणे अंमलदार रावसाहेब रावते आणि खुलताबादच्या ठाणे अंमलदार उज्ज्वला जाधव यांना पाच हजार रुपये दंड ठोठावत समोर हजर राहून खुलासा करण्याचे आदेश दिले. सिल्लोड शहर, पैठण, गंगापूर येथील पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक करत पुढेही असेच काम करण्याच्या सूचना केल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com