As soon as the police baton fell on his back, he remembered `lockdown` | Sarkarnama

पाठीवर पोलिसांच्या काठ्या पडताच त्यांना आठवला `लाॅकडाऊन`

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 एप्रिल 2020

दोन-तीन तासांतपो पोलिसांचा फाैजफाटा आला. एकच कोलाहाल झाला. धपाधप काठ्या पाठीत पडल्या, अन अजून लाॅकडाऊन संपलाच नसल्याची जाणीव लोकांना झाली. गुहा (ता. राहुरी) येथील हा प्रकार आज चर्चेचा ठरला.

राहुरी : सकाळी नियमीतपणे आठवडे बाजार भरला. लाॅकडाऊन संपला अशा अविर्भावात जनजीवन सुरळीत होऊ लागले. बहुतेकजण मास्क न लावताच घराबाहेर पडले. भाजीबाजारात तर झुंबड उडाली. या वेळी कुणीतरी पोलिसांना चुगली लावली. दोन-तीन तासांत पोलिसांचा फाैजफाटा आला. बाजारात एकच पळापळ सुरू झाली. पाठीवर धपाधप काठ्या पडल्या, अन अजून लाॅकडाऊन संपलाच नसल्याची जाणीव लोकांना झाली. गुहा (ता. राहुरी) येथील हा प्रकार आज चर्चेचा ठरला.
 
आज मंगळवारनिमित्त आठवडेबाजार भरणार, अशी कोणीतरी वार्ता सोडली. ती गाव व परिसरात कानोकानी पसरली. मारुती मंदिराजवळ भाजीविक्रेत्यांनी पटापट जागा पकडल्या. तासभरात हातात पिशव्या घेवून अनेक ग्रामस्थ घराबाहेर पडले. मास्क न लावताच अनेकजण येवू लागले. सकाळी साडेसात ते साडेआठ वाजे दरम्यान भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडाली. मांसाहरी व मद्यपींनी आधी मासळी व फुटाणे विक्रेत्याभोवती गर्दी केली. ढकला-ढकली सुरु केली. सोशल डिस्टन्सींगचा तर केव्हाच  फज्जा उडाला होता. विशेष म्हणजे बहुतांश भाजीविक्रेते व ग्रामस्थांच्या चेहऱ्याला मास्क नव्हते. कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. याचे भान हरपून ग्रामस्थ खरेदीसाठी तुटून पडले होते.

अन पोलिसांच्या काठ्या वाजल्या
कुणीतरी याबाबत पोलिसांना चुगली लावली. त्यामुळे पोलिसांचा फाैजफाटा बाजारात दाखल झाला. सकाळी पावणे नऊ वाजता पोलिसांच्या काठ्या अचानक वाजायला लागल्या. भान हरपून खरेदीचा आनंद घेत असलेल्या ग्रामस्थांची पळापळ सुरू झाली. वाट फुटेल तिकडे ग्रामस्थ धावत सुटले. भाजीपाला विक्रेत्यांनी फटके खाऊन, झटपट गाशा गुंडाळला. मारुती मंदिरासमोरील मैदान क्षणार्धात रिकामे झाले. कोरोना विषाणू अजूनही आपल्या भोवती पिंगा घालतोय, याची जाणीव ग्रामस्थांना झाली. आठवडे बाजार मोडला. काहींच्या थैल्या भरल्या. तर, काहीजण पोलिसांच्या काठीचा प्रसाद खाऊन रिकाम्या थैल्या हलवित घरी परतले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख