रजनी पाटलांच्या पाठीवर सोनियांचा हात! सुकर झाली भविष्यातील वाट!

‘यूआर माय लॉयल सोल्जर’ ‘मी, राहूल आणि पक्षाचे तुमच्यावर लक्ष असून भविष्यातही तुमची काळजी घेऊत’ असे म्हणत सोनिया गांधी यांनी रजनी पाटील यांच्या डोक्यावर आणि पाटीवर मायेचा हात फिरवला. या मायेच्या हातामुळे पाटील यांना पुढे राजकारणात कोठे संधी मिळणार, याची उत्सुकता आहे.
रजनी पाटलांच्या पाठीवर सोनियांचा हात! सुकर झाली भविष्यातील वाट!

बीड : सोनिया गांधींनी राजकारणात पाऊल टाकल्याच्या दिवशीपासून साथीदार असलेल्या रजनी पाटील यांच्यातील राजकारणाच्या पलिकडे असलेल्या अपुलकीच्या नात्याचा प्रत्यय मंगळवारी दिल्लीत आला. ‘भविष्यातही तुमची काळजी घेऊ’ असे अपुलकीने सोनिया गांधींनी सांगीतल्याने पुढे काय, असा प्रश्न असला तरी रजनी पाटील यांची भविष्यातील वाटचाल ही राज्याच्या राजकारणात असल्याचे बोलले जाते.

आगामी जून महिन्यात विधान परिषद किंवा राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली तर बीड लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला घेऊन त्या उमेदवार असतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. प्रदेश काॅंग्रेसमधील प्रभावी महिला चेहरा म्हणून रजनी पाटील यांचे महत्त्व कालच्या प्रसंगानंतर वाढणार आहे.

गांधी घराण्यातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा थोडासा सहवास लाभलेल्या रजनी गांधींना राजीव गांधींच्या काळात एनएसयुआय मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी एकदा राजीवजींचा केज दौराही घडविला होता. त्यावेळीच प्रथम त्यांनी सोनिया गांधींची भेट आणि ओळख झाली. राजकारणात पाऊल ठेवण्याच्या पहिल्या दिवशीपासून सोनिया गांधींच्या खास साथीदारांमध्ये गणल्या गेलेल्या रजनी पाटील या राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यानंतरच्या कार्यक्रमांत त्यांच्या रांगेतही आढळल्या. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी 'बीडकी बेटी अबकी बार केवल सांसदही नही, बल्की मंत्री बनेगी', असे जाहीर केलेले असतानाही त्यांनी सोनिया गांधींची साथ दिल्याने त्या सोनिया गांधींच्या गुडबुकमध्ये आहेत.

‘एनएसयुआय' च्या राज्य आणि राष्ट्रीय सचिव, पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या, कॉंग्रेसच्या महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा, महिला प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षा, खादी ग्रामोद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या आणि देशभर राबता असलेल्या केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळालेला आहे. ही सर्वच पदे त्यांना राजीव गांधी आणि सोनिया गांधीमुळेच मिळालेली आहेत. 

गांधीं घराण्यामुळे पदे मिळाली असली तरी सोनिया गांधींचा त्यांच्यावर असलेला जिव्हाळा अनेक प्रसंगांतून समोर आलेला आहे. असाच प्रसंग मंगळवारी दिल्लीत घडला. लोकसभेच्या सेंट्रल हॉलमधून सोनिया गांधी त्यांना न्याहळत असल्याचे लक्षात आल्याने त्या लगबगीने सोनिया गांधींकडे गेल्या. मात्र, घाईत त्यांची पर्स आणि मोबाईल कुमारी शैलजा यांच्याजवळच राहीला. राज्यसभेत कामाची संधी दिल्याबद्दल धन्यवाद म्हणत असताना ‘चला गाडीत बोलू’ म्हणत सोनियांनी त्यांना आपल्या वाहनातून थेट दहा जनपथ या घरी नेले. राज्यसभेतील कामात काही चुक झाली का, या प्रश्नावर ‘तुमचे काम उत्तम आहे, मी, राहूल आणि पक्षाकडे त्याची नोंद असून भविष्यातही आम्ही तुमची काळजी घेऊ असे म्हणू ‘यु आर माय लॉयल सोल्जर’ अशी शाबासकी देत त्यांच्या डोक्यावरुन आणि पाठीवरुन आपुलकीचा हात फिरवला.

एवढेच नाही तर पर्स विसरलेली असल्याने सोनियांनी त्यांना चक्क आपल्या चालकाकडून घेऊन टॅक्सीला पैसे दिले. विशेष म्हणजे सोनिया गांधी त्यांना आपुलकीने अरे तुरे बोलतात आणि रजनी अशीच हाक देतात. सोनियांनी दिलेली नोट कायमस्वरूपी स्वतःकडे ठेवणार असल्याची भावना रजनी पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, भविष्यात रजनी पाटील यांची वाटचाल काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. आगामी जून महिन्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये त्यांची वर्णी लागू शकते असेही आडाखे बांधले जात आहेत. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली तर बीडची जागा काँग्रेसच्या वाट्याला घेऊन रजनी पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

येथून यापूर्वी लोकसभेच्या आखाड्यात त्यांनी दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्यावर विजय मिळविल्याचा अनुभव आहे. तसे, मागील चार लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहीला तर राष्ट्रवादीला केवळ एकदा विजय मिळविता आलेला आहे. तसेच, लोकसभा निवडणुक लढविलेले राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवारांनी खांद्यावर भाजपचा झेंडा घेतल्याचा अनुभव आहे. त्यामुळे वाटाघाटीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येणे अवघड नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com