Some people are trying to defame me : Nimbalkar | Sarkarnama

काही अपप्रवृत्ती माझी जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत : खा.निंबाळकर 

सरकारनामा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

..

सोलापूर  :  कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला. दुष्काळी भागाचा दौऱ्या दरम्यान पाठीचा त्रास होऊ लागल्याने मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले. मात्र, काही अपप्रवृत्तीकडून जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खासदार  रणजितसिंह   निंबाळकरांनी केला आहे.

राज्यातील अतिवृष्टीने बळिराजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत ठोस उपाययोजना करून बाधित शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून  निवेदना द्वारे केली. त्या पार्श्वभूमीवर खासदार निंबाळकर बोलत होते. 

खा. निंबाळकर पुढे म्हणाले,  नीरा-देवधर, उजनी व नीरा उजवा कालवा या दोन्ही कॅनॉलमधून टेल टू हेड पाण्याचे व्यवस्थापन पाटबंधारे विभागाला करण्यास भाग पाडले. फलटण, लोणंद रेल्वे सुरू करणे, पालखी मार्गावरील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून एक हजार 200 कोटी रुपये मंजूर करून घेतले. माण तालुक्‍यातील दुष्काळी तालुक्‍याला वरदान ठरणारी जिहे-कटापूर योजना मंजूर करण्यासाठीही मोठे परिश्रम घेतले.

माढा लोकसभा मतदारसंघासह फलटण व माण तालुक्‍यातील बळिराजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणीही खासदार निंबाळकरांनी केली.पंढरपूर, सांगोला, माढा, करमाळा, माण, फलटण व माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चाही केली. गारपीटग्रस्त बळिराजालाही अर्थसहाय केले.

माढा लोकसभा मतदारसंघातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला जाणार आहे. याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ मदत मिळावी, अशा सूचनाही प्रशासनाला केल्या आहेत. याबाबत भाजप नेते जयकुमार शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख