सोलापूर युवक कॉंग्रेसने मागितली मल्लिकार्जुन खर्गेंची माफी

सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी डोळे वटारल्याने आंदोलनकर्त्यांनी माफीनामा सादर केला.
mallikarjun kharge and congress party workers
mallikarjun kharge and congress party workers

सोलापूर ः आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने गेल्या काही दिवसांत सोशल मीडिया आणि माध्यमातून चमकलेले सोलापूर युवक कॉंग्रेसचे सर्व तारे (पदाधिकारी) शनिवारी जमिनीवर आले आणि त्यांनी आपला माफीनामा थेट मल्लिकार्जुन खर्गे यांना सादर केला. गेल्या काही दिवसांत झालेल्या घडामोडींची दखल माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी गांभीर्याने घेतली, त्यांनी डोळे वटारल्याने आंदोलनकर्त्यांनी माफीनामा सादर केला.

युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाबा करगुळे यांनी श्री. खर्गे यांच्याकडे माफीनामा पाठविला आहे. त्यात म्हटले आहे, आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश मंत्रिमंडळात झाला नाही. त्यामुळे माझ्यासह नाराज झालेल्या युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपला पुतळा जाळला. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटत आहे. हे कृत्य आम्ही प्रणिती शिंदे यांच्या सांगण्यावरून केले नाही. आमदार शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही, त्यामुळे आमच्या भावना अनावर झाल्या. आपण महाराष्ट्राचे प्रभारी असल्याने आपला पुतळा आम्ही जाळलो. या घटनेबाबत मी आणि आमचे सर्व पदाधिकारी आपली जाहीर माफी मागत आहोत.

या प्रकरणावरून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार शिंदे याही आमच्यावर रागावल्या आहेत. शहर व जिल्हा कॉंग्रेस समितीने आम्हाला नोटीसही बजावली आहे. आम्ही कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. आमच्या कृत्यामुळे आपले मन दुखावले असेल तर आम्ही माफी मागतो व पक्ष जी शिक्षा देईल ती भोगण्यास आम्ही तयार आहोत,असे यात म्हटले आहे.

 दरम्यान, स्थानिक पातळीवर दिखाऊगिरी करण्याची धडपड सुरू असल्याची टीका सुरू झाली, त्यातच श्री. खर्गे यांचा पुतळा जाळल्याबद्दल कॉंग्रेसच्या सर्वस्तरावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याची परिणीती आज माफीनाम्यात झाली.

... तर तुम्ही काय केले असते?
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना 40 वर्षे कॉंग्रेसने सत्तेत ठेवले. त्यांच्यासाठी कोणतीही लॉबी कार्यरत नव्हती, त्यांच्यासाठी झटणारा किंवा आग्रह करणारा कोणताही गट नव्हता. श्री. शिंदे देशात एखाद्या राज्यात निरीक्षक म्हणून गेले आणि त्या ठिकाणी असा प्रकार झाला असता तर तुम्ही काय केले असते, असा घरचा आहेर कॉंग्रेसमधील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आमदार शिंदे यांना मंत्रिमंडळापासून डावलण्यात निरीक्षकांचा काही सहभाग नव्हता. त्याचा संबंध प्रदेश समितीशी आहे. उत्साहाच्या भरात चुकीचे कृती करून श्री. शिंदे यांना अडचणीत आणण्याचे काम युवा कार्यकर्त्यांनी करू नये, असेही मत ज्येष्ठांकडून व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com