सोलापुरात युती होण्यापूर्वीच वाढली शिवसेनेसाठी डोकेदुखी !

shivsena
shivsena

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेनेच्या युतीचा निर्णय अद्याप झालेला नसतानाही आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांमधील खदखद व जुन्या- नव्यांचा वाद शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

 कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून उमेदवारीचे स्वप्न घेऊन शिवसेनत प्रवेश केलेल्या नेत्यांमुळे पक्षनिष्ठ शिवसेनेच्या इच्छूकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्‍त करीत आता त्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. 50 आमदार निवडून आणण्याची जबाबदारी घेतलेले संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्यासमोर आता सोलापूर जिल्ह्यातील वाद मिटविण्याचे आव्हान उभे राहीले आहे. 

सोलापूर जिल्ह्यात करमाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा एकमेव आमदार नारायण पाटील आहेत. मात्र, राष्ट्रवादीतून नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्‍मी बागल यांच्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्याने या मतदारसंघातील शिवेसनेचे जुने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे.

तर कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना शिवसेनेत घेतल्याने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छूक असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजिव अमर पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी नाराज झाल्याची चर्चा आहे.

 तत्पूर्वी, भाजप- शिवसेना युती न झाल्यास या मतदारसंघावर जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा दावा आहे. तर यंदा आमदार व्हायचचं असे स्वप्न घेऊन महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवलेल्या जिल्हाप्रमुख महेश कोठे यांची दिलीप माने यांच्यामुळे पंचाईत झाली आहे.

युती न झाल्यास कोठे शहर उत्तर विधानसभा मतदासंघातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात निवडणूक लढवतील मात्र, युती झाल्यास त्यांच्यासाठी कोणता पर्याय, हा प्रश्‍न कायम आहे. त्यामुळे युतीचा निर्णय होण्यापूर्वीच इच्छूकांमधील वाद शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरु लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून उमेदवारीच्या अमिषाने शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांमुळे निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त करीत बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. तसेच युतीमुळे आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री असल्याने काही  इच्छूकांनी युतीपेक्षा स्वबळाची भाषा करायला सुरवात केल्याचीही चर्चा आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com