सोलापुरात `वंचित'मुळे पवार-शिंदे यांचे राजकारण अडचणीत, तर मोहिते-पाटलांना उभारी!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेससमोर यंदा भाजप-शिवसेनेसह वंचित बहुजन आघाडीचे आव्हान असणार आहे.
सोलापुरात `वंचित'मुळे पवार-शिंदे यांचे राजकारण अडचणीत, तर मोहिते-पाटलांना उभारी!

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेससमोर यंदा भाजप-शिवसेनेसह वंचित बहुजन आघाडीचे आव्हान असणार आहे. 

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने 2014 सारखीच कामगिरी करत सर्व निवडणूक पंडितांना धक्का दिला. यात दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांची मेहनत आहेच, पण एक छुपा हातही या विजयामागे होता, तो ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीचा. 

लोकसभेच्या निवडणुकीत या आघाडीमुळे राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अक्षरश: पानिपत झाले. विधानसभा निवडणुकीतही त्यांचे आव्हान असेल. 

आघाडीने आंबेडकरांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याला यश आले नव्हते. ऍड. आंबेडकरांनी घडवलेल्या दलित-मुस्लिम एकीने आघाडीची मते मोठ्या प्रमाणावर फुटली. त्यामुळे सहा मतदारसंघांत आघाडीचे उमेदवार पडले. आगामी काळातही हीच स्थिती होऊ शकते. आघाडीच्या अर्ध्या डझनपेक्षा जास्त जागा पाडून ऍड. आंबेडकरांनी आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच नव्हे, तर भाजप आणि शिवसेनेला त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. 

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा प्रभाव असलेल्या सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. सोलापूर आणि माढा या प्रतिष्ठेच्या जागा भाजपने सहज जिंकल्यानंतर पवार-शिंदे यांचे जिल्ह्यातील राजकारण अडचणीत आले आहे. तर मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाला उभारी आली आहे. 

गेली अनेक वर्षे "पवार-शिंदे बोले, सोलापूर हले' अशी स्थिती होती, लोकसभा निवडणुकीनंतर त्यास तडा गेला आहे. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणूक कॉंग्रेस आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई असेल. 

श्री. शिंदे यांचा सलग दुसऱ्यांदा झालेला पराभव त्यांच्यासह कॉंग्रेसच्या जिव्हारी लागला. तिसऱ्या क्रमांकाची एक लाख 70 हजार मते घेताना आंबेडकरांनी शिंदे यांना विजयापासून वंचित ठेवले. 

आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातही भाजपने 30 हजार 830 मतांची आघाडी मिळविली. त्यामुळे जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील गणिते हे वंचितच्या उमेदवारीनुसार बदलण्याची चिन्हे आहेत. 


मध्य, अक्कलकोट, पंढरपूरला लक्ष्य 

अक्कलकोट आणि सोलापूर शहर मध्य या कॉंग्रेसच्या ताब्यातील दोन मतदारसंघांत भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागणार आहे. अक्कलकोटमधून चार वेळा आमदार झालेले कॉंग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचेही राजकीय भवितव्य संकटात असल्याची चर्चा आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेलाही उधाण आले आहे. पंढरपूरचे आमदार भारत भालके हेही दोलायमान मनस्थितीत आहेत. या तीनही मतदारसंघांत वंचितचा उमेदवार विजयी झाला नाही तरी, कॉंग्रेसच्या उमेदवारासमोर आव्हान निश्‍चित उभा करू शकतो, अशी स्थिती आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com