Solapur Politics may take unexpected turn | Sarkarnama

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ 

प्रमोद बोडके  
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

राज्यात महाशिवआघाडी सत्तेत आल्यानंतर सांगोला, करमाळा, माढा, मोहोळ आणि सोलापूर शहर मध्य या मतदार संघाचे राजकीय गणितच बदलून जाणार आहे.

सोलापूर :  शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांची महाशिवआघाडी राज्यात सत्तेवर येण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. महाशिवआघाडीने  सोलापूर जिल्ह्यात अनेक नेत्यांची पंचाईत होणार आहे . परस्परांचे कट्टर वैरी असलेल्या नेत्यांना मन मारून एकत्र बसावे लागणार आहे . 

महायुतीतून शिवसेनेने जिल्ह्यातील सहा जागा लढल्या तर भाजपने पाच जागा. सांगोल्यातील शहाजी पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेला एका जागेवर यश मिळाले. भाजपने मात्र दोनाचे चार करत बाजी मारली.

राज्यात महाशिवआघाडी सत्तेत आल्यानंतर सांगोला, करमाळा, माढा, मोहोळ आणि सोलापूर शहर मध्य या मतदार संघाचे राजकीय गणितच बदलून जाणार आहे.

विधानसभा निवडणूक हरलो म्हणून दुख: मानायचे की, आपण हारून देखील आपला पक्ष सत्तेत आला म्हणून समाधानी व्हायचं? अशीच द्विधा मनःस्थिती जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांसमोर आली आहे.

ज्यांनी आपल्याला पराभूत केले तेच आमदार आता महाशिवआघाडीच्या माध्यमातून राज्यात सत्तेचा गाडा हाकताना दिसण्याची शक्‍यता असल्याने जनतेत नेमके कोणत्या मुद्यांवर जायचे? हा प्रश्‍न देखील येत्या काळात शिवसेनेच्या उमेदवारांना पडण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेना उमेदवार दिलीप सोपल विरुद्ध अपक्ष राजेंद्र राऊत ही बार्शीची पारंपरिक लढत यंदाही झाली. राऊतांनी भाजपशी घरोबा केल्याने महाशिवआघाडी दिलीप सोपल यांच्यासाठी सोईस्करच झाली आहे.

बार्शीसाठी सोईस्कर ठरणारी महाशिवआघाडी सांगोल्यासाठी तापदायक ठरणार आहे. राष्ट्रवादीचा मित्र असलेल्या शेकापचा उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांना पराभूत करण्यासाठी माजी आमदार दीपक साळुंखे यांनी निवडणुकीच्या अगोदर शिवसेनेच्या शहाजी पाटील यांच्या पाठीशी उघडपणे उभा राहण्याची भूमिका घेतली.

आज शिवसेना-राष्ट्रवादी जरी महाशिवआघाडीतून एकत्रित येण्याची शक्‍यता असली तरीही शेकापचे करायचे काय? हा प्रश्‍न सांगोल्याच्या बाबतीत निर्णय घेताना होणार आहे.

 करमाळ्यातून अपक्ष विजयी झालेले संजय शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला असला तरीही भविष्यात अजित पवारांनी दिलेल्या हाकेला ओ देण्यासाठी संजय शिंदे तत्काळ धावून जाण्याची शक्‍यता आहे.

अपक्ष शिंदे आणि पराभूत उमेदवार रश्‍मी बागल यांना पुन्हा एकत्रित काम करण्याची संधी महाशिव आघाडीच्या माध्यमातून येण्याची शक्‍यता आहे. 

माजी आमदार नारायण पाटील यांची येत्या काळातील भूमिका तालुक्‍याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे. माढ्यात आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात काम केलेल्या शिवसैनिकांची आणि मोहोळमध्ये राजन पाटील यांच्या विरोधात काम करणाऱ्या शिवसेनेची भूमिका येत्या काळात महत्त्वाची असणार आहे. 

शहर मध्यमध्ये आमदार प्रणिती शिंदे विजयी झाल्या परंतु माजी आमदार दिलीप माने यांची राजकीय कोंडीच या महाशिव आघाडीतून होण्याची शक्‍यता आहे.

महेश कोठे येत्या काळात शिवसेनेत थांबणार की राजकीय स्पेस असलेल्या भाजपत जाणार? यावर देखील आगामी निवडणुकीची रणनीती अवलंबून आहे.

महाशिवआघाडी झाल्यास या आघाडीचे भवितव्य किती दिवस असणार? याबद्दल सर्वांच्या मनात धाकधूक असल्याने आतापासूनच निवडणुकीची तयारी म्हणून इच्छुकांनी राजकीय निर्णय व जुळवा-जुळव करावी लागणार आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात झेंड्यांना फारसे महत्त्व राहिलेले नाही. व्यक्तीच्या विरोधात राजकारण करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रसिद्ध आहे.

तो या पक्षात आहे म्हणून मी दुसऱ्या पक्षात अशीच काहीशी स्थिती जिल्ह्याच्या राजकारणात राहिल्याने विविध पक्षातील समविचारींची अंतर्गत खेळी जिल्ह्याच्या राजकारणात यापूर्वी अनेकदा दिसली आहे. येत्या काळात या खेळीला अधिक महत्त्व प्राप्त होण्याची शक्‍यता आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख