solapur politics | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

चौरंगी लढतीत करमाळ्यातील "आदिनाथ'वर झेंडा कुणाचा ? 

अण्णा काळे 
सोमवार, 8 मे 2017

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वाटाघाटी करून युती करण्याच्या सर्व चर्चा आणि उपचर्चा अपयशी ठरल्यानंतर ही निवडणूक चौरंगी होत आहे. आमदार नारायण पाटील गट, जिल्हा बॅंकेच्या संचालिका रश्‍मी बागल गट, माजी आमदार जयवंतराव जगताप गट आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्या गटांतील ही तुल्यबळ लढत सोलापूर जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू झाला आहे.

करमाळा : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वाटाघाटी करून युती करण्याच्या सर्व चर्चा आणि उपचर्चा अपयशी ठरल्यानंतर ही निवडणूक चौरंगी होत आहे. आमदार नारायण पाटील गट, जिल्हा बॅंकेच्या संचालिका रश्‍मी बागल गट, माजी आमदार जयवंतराव जगताप गट आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्या गटांतील ही तुल्यबळ लढत सोलापूर जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे "आदिनाथ'च्या निवडणुकीत एकमेकांवर तुफान चिखलफेक होणार, हे निश्‍चित. 

संगोबातील श्री आदिनाथ मंदिरात नारळ फोडून चारही गटांनी प्रचार शुभारंभ केला आहे. या निवडणुकीत नारायण पाटील- जयवंतराव जगताप यांच्यातील युती आदिनाथला टिकणार का, याची चर्चा होती. आमदार नारायण पाटलांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांना विधानसभा निवडणुकीनंतर अध्यक्षपद देऊ, असा मुद्या मांडला, तर श्री. जगताप यांनी स्वतःकडे अध्यक्षपद व 75-25 टक्के जागेचा फॉर्मुला मांडला. आमदार नारायण पाटील व श्री. जगताप आपापल्या मुद्दावर ठाम राहिल्याने ही युती झाली नाही. अकलूजकर यावर तोडगा काढतील असे वाटत असताना जगताप यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांचे कार्यकर्ते यांच्यात युती करण्याच्या चर्चाही झाल्या. आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत 4 मे रोजी युतीबाबत बैठक झाली. मात्र जागावाटपावरून ही युती झाली नाही. 

जगतापांची कधी आमदार नारायण पाटील तर कधी संजय शिंदे यांच्याशी युतीबाबत बोलणी सुरू होती. बागल गट संजय शिंदे यांच्यातही एकत्र येण्याबाबत बोलणी सुरू होती. आदिनाथ कारखान्याची निवडणूक तिरंगी होणारे की चौरंगी याची उत्सुकता शेवटपर्यंत राहिली.अगदी 
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक तास वेळ असताना कोणाची कोणाबरोबर युती होत नसल्याने चारही गटाने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. 

उमेदवारी अर्ज भरल्यापासून ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्‍यता होती. उमेदवारी छाननीपासुनच 
कोण कोणाबरोबर युती-आघाडी करणार या विषयी अनेक घडामोडी घडल्या. बागल गटाचे नेते व संजय शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यात बैठकांवर बैठका झाल्या. पाटील गटाचे व जगताप गटाचे कार्यकर्ते युती बाबत चर्चा करत होते. माजी आमदार जयवंतराव जगताप व जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्यात ता.4 रोजी बैठक झाली. त्यामुळे जगताप-शिंदे युती होण्याची आशा कार्यकर्त्यांना वाटत होती. मात्र जागा वाटपावरून ही युती झाली नाही. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच मे रोजी बागल-शिंदे, शिंदे-जगताप, पाटील-जगताप यांच्यात युती-आघाडी करण्यावरून बरीच खलबते झाली. शेवटच्या क्षणी नेतेमंडळी थेट फोन वरून एकमेंकाशी बोलली. मात्र कोणाचीच कोणाबरोबर युती-आघाडी झाली नाही. त्यामुळे चौरंगी लढत होत आहे. 

एकमेकांबरोबर युती आघाडी करण्याची भाषा करणारे नेते, कार्यकर्ते प्रचार सुरू झाल्यापासून मात्र एकमेकांवर चिखलफेक करू लागले आहेत. या निवडणुकीत आमदार नारायण पाटील गट, बागल गट, जगताप गट, शिंदे गट अशी चौरंगी लढत होत आहे. कर्जाचा डोंगर, कामगारांच्या पगारी, बॅंकांची देणी, ऊस वाहतूकदार, कामगारांच्या नावावरील कर्ज या मुद्द्याला बगल देत निवडणूक जशी-जशी जवळ येईल, तसतसे राजकारणाला वेगळे वळण येऊ लागले आहे. 

सोशल मिडियातून एकमेकांवर कुरघोडी 
आमदार नारायण पाटील व जिल्हा बॅंकेच्या संचालिका रश्‍मी बागल, दिग्विजय बागल यांच्यात एक मे रोजी झालेली शाब्दिक चकमक निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच झाल्याची जिल्हाभर जोरात चर्चा सुरू आहे. याबाबत दोन्ही गट आपापल्या पद्धतीने स्पष्टीकरण देत आहेत. सोशल मिडियातून बागल गटाकडून आमदार नारायण पाटील यांच्या वर्तनावर पोस्ट टाकल्या जात आहेत. पाटील गटाकडून बागल गटाची सत्ता गेल्याने व आदिनाथचा पराभव दिसत असल्याने बागल कसे अस्वस्थ आहेत, आदिनाथ बागलांनी कसा बुडविला, दिग्विजय बागलांना लोकप्रतिनिधींना आरेतुरे बोलणे शोभते का? रश्‍मी बागल महिला असल्याचे कसे भांडवल करतात, याविषयी सोशल मिडियातून पोस्ट टाकल्या जात आहेत. दोन्ही गटाचे कार्यकर्ते पातळी सोडून एकमेकांविषयी कमेंटस करत आहेत. असे असले तरी वस्तुस्थिती नेमकी काय आहे? या मागचे राजकारण काय आहे याची जाणीव तालुक्‍याला निश्‍चित आहे. या घडलेल्या प्रकारावर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप आपापल्या शैलीत टिप्पणी करत आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


फोटो फीचर