सोलापुरात औटघटकेचा `समविचारी' प्रयोग! 

जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत प्रमुख राजकीय पक्षांना बाजूला ठेवून समविचारी आघाडी (?) आकारास आली होती. जिल्ह्याचे राजकारण या समविचारींच्या भोवती फिरत राहिले.विधान परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या आघाडीने चांगले यश संपादन केले.मोहिते-पाटील विरोध हा या समविचारी मित्रांमधील महत्त्वाचा दुवा होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोहिते-पाटील यांनी भाजपत प्रवेश केला आणि या समविचारी आघाडीला घरघर लागण्यास सुरवात झाली.
सोलापुरात औटघटकेचा `समविचारी' प्रयोग! 

जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत प्रमुख राजकीय पक्षांना बाजूला ठेवून समविचारी आघाडी (?) आकारास आली होती. जिल्ह्याचे राजकारण या समविचारींच्या भोवती फिरत राहिले. विधान परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या आघाडीने चांगले यश संपादन केले. 

मोहिते-पाटील विरोध हा या समविचारी मित्रांमधील महत्त्वाचा दुवा होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोहिते-पाटील यांनी भाजपत प्रवेश केला आणि या समविचारी आघाडीला घरघर लागण्यास सुरवात झाली. या आघाडीमधील महत्त्वाचे शिलेदार असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला तर अन्य शिलेदारांना आपल्या भागात वर्चस्व राखता आले नाही, हे वास्तव आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद सभापती विजयराज डोंगरे, मंगळवेढ्यातील दमाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, माजी आमदार शहाजी पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर या दुसऱ्या फळीतील तरुण मित्रांनी एकत्र येत जिल्ह्याचे राजकारण आपल्या हातात घेतले. या समविचारींनी विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पहिला दणका राष्ट्रवादीला दिला. तर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळून राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवले. 

जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झालेला हा प्रयोग औटघटकेचा ठरल्याचे लोकसभा निवडणुकीनंतर लक्षात येत आहे. 
माढा लोकसभा निवडणुकीत गेली 30 हून अधिक वर्षे शिंदे कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांना केवळ सहा हजार 505 इतके मताधिक्‍य मिळाले आहे. माढा तालुक्‍यातील 84 गावांतून संजय शिंदे यांना 17 हजार 285चे मताधिक्‍य मिळाले तर पंढरपूर तालुक्‍यातील 42 गावांतून संजय शिंदे यांना सहा हजार 527 मतांची आघाडी मिळाली आहे. माढा विधानसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्‍यातील 14 गावांतून संजय शिंदेंची मोहिते-पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे मोठी पीछेहाट झाली. 

मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्‍यातील या गावांमधून निंबाळकर यांना 18 हजार 83चे मताधिक्‍य आहे. माळशिरस तालुक्‍यातील गावांतून मिळालेले मताधिक्‍य माढा तालुक्‍यातील 84 गावांतील मताधिक्‍यापेक्षाही अधिक आहे. 

भाजपचे सहयोगी आमदार असलेल्या प्रशांत परिचारक यांच्या बालेकिल्ल्यात पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना सुमारे सहा हजार 200चे मताधिक्‍य मिळाले आहे. मागील निवडणुकीत आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे यांच्यासह अनेक दिग्गज नेते शिंदे यांच्या बाजूने असताना देखील भाजपच्या शरद बनसोडे यांनी शिंदे यांच्यापेक्षा सुमारे 17 हजार मतांची आघाडी मिळवली होती. यंदा मात्र श्री. शिंदे यांना मताधिक्‍क्‍य आहे. 

दुसरीकडे माढा मतदारसंघात समावेश असलेल्या पंढरपूर तालुक्‍यातील 42 गावांतून राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना सहा हजार 527 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही पातळ्यांवर परिचारकांची पिछेहाट झाल्याचे दिसत असून ही त्यांच्यासाठी धोक्‍याची घंटा आहे. 

मोहोळच्या राजकारणात अनगरकर आणि शेटफळकर यांच्यात वितुष्ठ आल्यानंतर येथील राजकारणही बदलले आहे. मनोहर डोंगरे यांचे सुपुत्र विजयराज डोंगरे यांनी समविचारी आघाडीच्या माध्यमातील जिल्हा परिषदेत सभापती पद मिळविले आणि मोहोळच्या राजकारणावर आपला ठसा उमटवण्यास सुरवात केली. निवडणुकीच्या अगोदर काही दिवस डोंगरे यांनी मोठा गाजावाजा करत भाजपत प्रवेश केला. मात्र, लोकसभा निवडणुकीची आकडेवारी डोंगरे यांच्यासाठी धोकादायक आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून 15 हजार 429 मतांची आघाडी मिळाली आहे, तर मोहोळ तालुक्‍यातून साडेनऊ हजारांची आघाडी मिळाली आहे. 

समविचारी आघाडीतील एक महत्त्चाचे शिलेदार म्हणजे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत. राऊत हे भाजपत असले तरी ते समविचारी आघाडीचा महत्त्वाचा घटक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने अंतर्गत खिंड लढविण्यात राऊत आघाडीवर होते. मात्र, बार्शी मतदारसंघातील मतदारांनी त्यांनाही चिंतेत टाकले आहे. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना अवघे 928 इतके मताधिक्‍य मिळाले आहे. विशेष म्हणजे, 2014 च्या निवडणुकीत माजी खासदार रवी गायकवाड यांना 55 हजारांचे मताधिक्‍य होते. मात्र ग्रामीण भागातून शिवसेनेला तीन हजार 100 मतांची आघाडी आहे. 

समविचारी आघाडीचे आणखी एक शिलेदार म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनाही लोकसभा निवडणुकीत विशेष कामगिरी करता आली नाही, हे निकालानंतरच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कारण, सांगोला विधानसभा मतदारसंघातून संजय शिंदे यांना सुमारे साडेतीन हजारांचे मताधिक्‍क्‍य मिळाले आहे. विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत यांना सुमारे 14 हजारांचे मताधिक्‍क्‍य मिळाले होते. युतीला ते मताधिक्‍क्‍य तर टिकवता आलेच नाही. मिळालेल्या मतदानातही मोदी लाट, राष्ट्रवादीवरील रोष आणि शहाजी पाटील यांचा वाटा किती हा प्रश्‍न आहे. 

मोहिते-पाटील हा या समविचारी आघाडीचा एकमुखी अजेंडा होता. मात्र, मोहिते-पाटलांच्या भाजप प्रवेशाने या सर्वांची गोची झाली आहे. त्यातही माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर यांची तर जास्तच गोची झाली आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखाहून अधिक मताधिक्‍क्‍य मिळाले आहे. माळशिरस मतदारसंघानेच खऱ्या अर्थाने निंबाळकर यांना विजयी केले. मात्र, याचे सर्व श्रेय मोहिते-पाटील यांना दिले जात असल्याने जानकर यांच्यावर हात चोळत बसण्याची वेळ आली आहे. 

समविचारींच्या भोवतीच निवडणूक 

लोकसभा निवडणुकीत एका गोष्टीचे श्रेय मात्र समविचारी आघाडीला नक्कीच दिले पाहिजे, ते म्हणजे ही संपूर्ण निवडणूक समविचारींभोवतीच फिरत असल्याचे दिसून आले. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे हे दोघेही समविचारी आघाडीत एकत्र होते. निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी जाहीर होईपर्यंत सर्व गोष्टी या समविचारी आघाडीच्या आजूबाजूला फिरत होत्या. तसेच प्रशांत परिचारक, उत्तम जानकर, राजेंद्र राऊत, शहाजी पाटील यांच्या भूमिकांविषयी निवडणूक काळात सातत्याने चर्चा होत होती. त्यामुळे माढ्याची निवडणूक सबकुछ समविचारी आघाडी अशीच होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com