पहिल्या पराभव, दुसऱ्यांदा गुलाल : यश मिळेपर्यंत संजय शिंदेंनी ठेवली जिद्द 

जिल्ह्यातील समविचारी राजकारण्यांची सर्वपक्षीय मोट बांधणारे नेतृत्व म्हणून संजय शिंदे यांची ओळख आहे. 2014 ते 2019 या पाच वर्षात संजय शिंदे यांनी वैयक्तिक व गट म्हणून माढा व करमाळा तालुक्‍यातील तब्बल नऊ निवडणुका लढल्या आहेत. नऊ पैकी तीन निवडणुकांमध्ये यश तर सहा निवडणुकांमध्ये त्यांना अपयश मिळाले. अपयश मिळाल्यानंतरही जिद्द, आत्मविश्‍वासाच्या जोरावर करमाळ्याची आमदारकी मिळविली आहे. त्यांच्या आमदारकीमुळे विधानसभेत दोन भाऊ जाण्याची राजकीय घटना जिल्ह्याच्या राजकारणात प्रथमच घडली आहे.
Sanjay Shinde MLA Karmala
Sanjay Shinde MLA Karmala

संजय शिंदे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माढा तालुक्‍यातील 36 गावांच्या जोरावर करमाळ्यातून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली. पहिल्याच प्रयत्नात अवघ्या अडीच हजार मतांनी त्यांची आमदारकी हुकल्यानंतर 2014-2019 या पाच वर्षात त्यांनी पूर्ण लक्ष करमाळ्यावर केंद्रित केले होते. या पाच वर्षात या मतदार संघातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना, करमाळा व कुर्डुवाडी बाजार समिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती, जिल्हा परिषद अध्यक्ष, करमाळा व कुर्डुवाडी नगरपरिषद, 2019 ची लोकसभा आणि आताची विधानसभा अशा निवडणुका लढविल्या. 

जिल्हा परिषद अध्यक्ष, कुर्डुवाडी बाजार समिती येथील यश वगळता उल्लेखनीय यश त्यांना व त्यांच्या गटाला मिळविता आले नाही. पाच वर्षात नऊ निवडणुका लढवूनही शिंदे यांनी आत्मविश्‍वास आणि जिद्द कायम ठेवल्याने यंदाच्या निवडणुकीत करमाळ्यातून यश मिळाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पुरेपूर वापर शिंदे यांनी करमाळा तालुक्‍यासाठी केल्याने या तालुक्‍यात प्रवेश करण्यास त्यांना मोठी मदत झाली. सुरवातीला बागल व नंतर नारायण पाटील असे दोन्ही राजकीय पर्याय अजमावलेल्या माजी आमदार जयवंतराव जगताप यांना राजकीय वैभवासाठी शिंदे यांच्या शिवाय नव्हता. बाजार समिती प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर जगतापांना शिंदेंनी केलेली सर्वतोपरी मदत करमाळ्यातील नव्या राजकीय समिकरणांना जन्म देऊन गेली. राष्ट्रवादीने आयत्या वेळी दिलेला पाठिंबा आणि जगतापांची मिळालेली साथ या मुळे शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही विधानसभा निवडणुकीत यश मिळविले आहे. 

भोसरे गटातील जिल्हा परिषद निवडणुकीत संजय पाटील घाटणेकर यांच्याकडून झालेला पराभव, बळीराम साठे जि. प. अध्यक्ष होताना हुकलेली अध्यक्षपदाची संधी, दिलीप सोपल जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष झाल्यानंतर बॅंकेच्या अध्यक्षपदाची हुकलेली संधी, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता असताना विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामुळे हुकलेली संधी आणि 2014 च्या निवडणुकीत करमाळ्याच्या आमदारकीची शिंदे यांची संधी थोडक्‍यात हुकली. ज्या ज्या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात शिंदे यांची संधी हुकली ती संधी त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात साध्य केल्याचे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com