solapur-cm-tour-deshmukhs-crisis | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांसमक्षही सोलापूरच्या देशमुखांत दुरावा कायम

संतोष सिरसट
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

सोलापूर शहर-जिल्हा भाजपमध्ये दोन्ही देशमुखांचे किती "सख्य' आहे हे सर्वश्रुत आहे. राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे मुख्यमंत्री मुंबईला जाईपर्यंत त्यांच्यासोबत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत असूनही त्यांच्यामध्ये असलेला दुरावा लपून राहिलेला नाही. 

सोलापूर शहर-जिल्हा भाजपमध्ये दोन्ही देशमुखांचे किती "सख्य' आहे हे सर्वश्रुत आहे. राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे मुख्यमंत्री मुंबईला जाईपर्यंत त्यांच्यासोबत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत असूनही त्यांच्यामध्ये असलेला दुरावा लपून राहिलेला नाही. 

"देशमुखी' वादाने सोलापूर जिल्ह्यातील भाजपची स्थिती दयनीय झाली आहे. सोलापूरकरांनी मोठ्या विश्‍वासाने दिलेली सत्ता या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. श्रेयवादासाठी सुरू असलेली ही लढाई पक्षाला बिकट स्थितीत घेऊन जाईल हे सांगण्यास कोण्या ज्योतिषाची गरज नाही. या दोघांमध्ये सुरू असलेल्या या "लढाई'ला ब्रेक लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनीही केला होता. पण, त्याचाही काहीच परिणाम झाला नसल्याचे जिल्ह्यातील जनतेने पाहिले आहे. बुधवारी (ता. 17) मुख्यमंत्री वेगवेगळ्या विकास कामांच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सहकारमंत्री देशमुख मुख्यमंत्र्यांसमवेत विमानातून सोलापूरला आले. तर पालकमंत्री देशमुख हे आपल्या नेत्याच्या स्वागताला विमानतळावर गेले. विमानतळावर पक्षाचे अनेक कार्यकर्ते स्वागतासाठी गेले होते. मात्र, मुख्यमंत्री आढावा बैठकीसाठी आल्याने त्यांच्या दौऱ्यात फारसा डामडौल दिसला नाही. 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा निश्‍चितच महत्त्वाचा होता. जरी या दौऱ्यात पक्षीय पातळीवर काही चर्चा झाल्या नसल्या तरी बैठकीसाठी खासदार अमर साबळे यांची उपस्थितीत खूप काही सांगून गेली. 

एरव्ही सोलापुरात नसणारे खासदार शरद बनसोडे हे मुख्यमंत्री येणार असल्यामुळे सोलापुरात आले. आढावा बैठकीत ते सहभागी झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यापूर्वी खासदार बनसोडे यांनी महापालिकेत सुरू असलेल्या गटबाजीची माहिती सगळ्यांनाच दिली. पक्षाचा खासदार उघडपणे गटबाजीबद्दल बोलत असेल तर हे वरिष्ठांनाही मान्यच आहे का? असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो. खासदार बनसोडे यांची मागील साडेचार वर्षाची कारकीर्द पाहता पक्ष त्यांना पुन्हा उमेदवारी देईल का? याबाबत साशंकता आहे. पण, खासदार बनसोडे मात्र आपल्यालाच उमेदवारी मिळेल यावर ठाम आहेत. पत्रकारांना त्यांनी उघडपणे तसे सांगितलेही आहे. जर बनसोडेंनाच उमेदवारी दिली जाणार असेल तर खासदार साबळे यांच्या सोलापूरच्या वाढलेल्या दौऱ्याचे कारण काय? हाही कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्‍न आहे. 

जिल्ह्यातील दोन मंत्री, खासदार बनसोडे, साबळे, महापौर शोभा बनशेट्टी हे सगळेच मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते. पण, त्यावेळी व एकूणच संपूर्ण दौऱ्यात दोन्ही देशमुखांमध्ये असलेला "दुरावा' प्रकर्षाने जाणवत होता, हे मात्र निश्‍चित.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख