राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची वाट लागते : उद्धव यांच्या वाक्याचा धुमाकूळ

आपापले पक्ष सोडून भाजपामध्ये दाखल झालेल्या या नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. यात नारायण राणे आघाडीवर असून हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक अशा अनेक नेत्यांच्या समावेश आहे.
राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची वाट लागते : उद्धव यांच्या वाक्याचा धुमाकूळ

कणकवली ः राज्यात सत्ता स्थापन करण्यास भाजपने नकार दिला. त्यानंतर अलीकडच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राणेंसह अनेक नेतेमंडळी सोशल मीडियावर ट्रोल झाली आहेत. विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा संदर्भ घेत या सर्व मंडळींवर नेटकऱ्यांनी चांगलीच टीका केली आहे. यात राणेंवर सर्वाधिक टीका झाली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  पत्रकार परिषद घेऊन भाजपा सत्ता स्थापन करणार नाही असे सांगितले. त्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार राज्यात येण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. या घडामोडीत विविध पक्षातून भाजपमध्ये आलेली नेतेमंडळी सोशल मिडियावर चांगलीच ट्रोल झाली आहेत. आपापले पक्ष सोडून भाजपामध्ये दाखल झालेल्या या नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. यात नारायण राणे आघाडीवर असून हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक अशा अनेक नेत्यांच्या समावेश आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत सभा घेतली. या सभेत त्यांनी, "राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची वाट लागते' अशी टीका केली होती. ठाकरेंची ही टीका प्रत्यक्षात उतरली असल्याची टीका फेसबुक, व्हॉट्‌सअप नेटकऱ्यांकडून व्यक्‍त होतेय. त्याअनुषंगाने खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नीतेश राणे यांचा एकत्रित फोटो वापरून "ये कहा आ गये हम" अशी टिपणी असलेली छबी अधिक व्हायरल होत आहे.

विधानसभा निकालानंतर आमदार नीतेश राणे यांनी, आदित्य ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. आता ही इच्छा कशी पूर्ण होणार असाही प्रश्‍न नीतेश राणे यांना विचारला जात आहे. नारायण राणे हे शिवसेनेत असताना त्यांनी विरोधी पक्षनेत्याची धुरा सांभाळली होती. आता ते पुन्हा विरोधी पक्ष नेते होणार का? असाही प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान, आजपर्यंत एकमेकांसोबत असलेले एकमेकांच्या विरोधात आणि राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी कट्टर विरोधक एकत्र येत आहेत. त्याचाही समाचार नेटकऱ्यांनी या नेत्यांची जुनी भाषणे, वृत्तपत्रातील टीकेची कात्रणे सोशल मिडियावर टाकून घेतला आहे.

पुन्हा विरोधी पक्षाचे आमदार!

दहा वर्षांपासून कणकवली विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून येत आहे. यंदा कणकवलीतून नीतेश राणे हे कमळ निशाणीवर निवडून आल्याने, विरोधी पक्षाचा मतदारसंघ ही कणकवलीची परंपरा यंदाच्या निवडणुकीत खंडित होणार असल्याची चर्चा होती; मात्र आता भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे राणे पुन्हा विरोधी पक्षाचे आमदार, अशीही टीका केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com