Smart city sammelan Nagpur | Sarkarnama

स्मार्ट सिटी संमेलनाचा फज्जा 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्र्यांच्या शहरात राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट सिटी संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाला देशातील 100 महापौर उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु आज प्रत्यक्षात केवळ दोनच महापौरांनी हजेरी लावल्याने महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. 

नागपूर : मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्र्यांच्या शहरात राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट सिटी संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाला देशातील 100 महापौर उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु आज प्रत्यक्षात केवळ दोनच महापौरांनी हजेरी लावल्याने महापालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये निवड झालेल्या देशातील 100 शहरांच्या महापौरांना निमंत्रणे धाडण्यात आली होती. स्मार्ट सिटी कशी राहिली पाहिजे, शहरातील नवे उपक्रमाची व विचारांची आदानप्रदान करण्याच्या हेतूने हे संमेलन दिल्लीतील इलेट इंफोटेकने आयोजित केले आहे. हे संमेलन नागपुरात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केले आहे. जबलपूर व रायपूर या दोन शहरातील महापौर वगळता इतर महापौरांनी नागपुरात येणे टाळले. महाराष्ट्रातील अनेक शहरे स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये आहेत. यात ठाणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक या शहरांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावातील महापौरांनी दिलेल्या निमंत्रणानंतरही या शहरातील महापौर आले नाहीत. 

महापौरांच्या अनुपस्थितीमुळे या सर्व कार्यक्रमाचा रंग उडून गेला. त्यामुळे महापौर नंदा जिचकार यांनाच मुख्य भाषण करून उद्‌घाटनाचा कार्यक्रम उरकावा लागला. शनिवारी या संमेलनाचा समारोप होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या संमेलनाची यशस्वी सांगता या दोन नेत्यांच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख