खांद्यावर 'स्टार' येणार कधी? उपनिरीक्षकपदासाठी 600 हवालदारांची प्रतीक्षा सुरूच

विभागांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही 2013 ते 2018 या काळातील तब्बल 600 हवालदारांना अधिकारी दर्जाच्या उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आलेली नाही.
खांद्यावर 'स्टार' येणार कधी? उपनिरीक्षकपदासाठी 600 हवालदारांची प्रतीक्षा सुरूच

अंधेरी : खांद्यावर कधीतरी 'स्टार' येतील, या आशेने काम करत राहिलो... नियमानुसार परीक्षा उत्तीर्ण झालो; तरीही बढती मिळण्याचे चिन्ह दिसत नाही... ही खंत आहे राज्य पोलिस दलातील सुमारे 600 हवालदारांची. विभागांतर्गत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही 2013 ते 2018 या काळातील तब्बल 600 हवालदारांना अधिकारी दर्जाच्या उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आलेली नाही. 

पदोन्नतीची वाट पाहातच 50 ते 60 हवालदार निवृत्तही झाले आहेत. राज्य पोलिस दलातील 600 हवालदार अनेक वर्षांपासून उपनिरीक्षकपदी बढती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पोलिस उपनिरीक्षकांची 50 टक्के पदे राज्य लोक सेवा आयोगामार्फत (एमपीएससी) थेट भरली जातात. पोलिस दलात शिपाई म्हणून सात वर्षे सेवा आणि पदवीपर्यंत शिक्षण असल्यास अंतर्गत परीक्षेद्वारे उपनिरीक्षकांची 25 टक्के पदे भरता येते. उर्वरित 25 टक्के पदे पाच वर्षे हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या पदवीधरांमधून अंतर्गत परीक्षेद्वारे भरली जातात. 

सेवा संपण्यास तीन ते चार वर्षे असताना अशी बढती मिळते. हवालदाराचे पद मिळेपर्यंत पोलिस दलातील जवळपास 25 वर्षे सेवा पूर्ण होते. या पद्धतीने बढती देणे बंद करावे, अशी शिफारस मुंबई पोलिस दलाने काही वर्षांपूर्वी केली होती. गृह विभागाने मात्र अशी बढती रद्द न करता सेवाज्येष्ठतेनुसार यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मार्च 2019 मध्ये गृह विभागाकडे यादी पाठवण्यात आली; मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या हवालदारांची तगमग सुरू आहे. हक्काची बढती मिळावी म्हणून अनेक वेळा हवालदारांनी निवेदन दिले, तोंडी विनंती केली; मात्र दखल घेण्यात आलेली नाही.

वेतन, पेन्शनमध्येही फरक

अधिकारी दर्जाचे पोलिस उपनिरीक्षक आणि हवालदार यांच्या वेतनात काही हजारांचा फरक असतो. त्याचप्रमाणे उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाल्यावर पेन्शनही अधिक मिळते. निवृत्तिवेतनात 4000 ते 5000 रुपयांचा फरक असतो, असे सांगण्यात आले.

मुंबईतील 360 जणांना आस

मुंबई पोलिस दलाचा व्याप मोठा असल्याने रिक्त उपनिरीक्षकपदे तातडीने भरण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला होता. अंतर्गत भरतीतून बढती देण्यात येणार होती. या 600 जणांच्या यादीत मुंबईतील 360 जणांचा समावेश आहे.

पोलिस हवालदारांना उपनिरीक्षकपदी बढती देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. पदोन्नती देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल - कुलवंद कुमार सरंगल, अप्पर पोलिस महासंचालक (आस्थापना विभाग )
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com