sitaram yechuri lecture | Sarkarnama

"संघा'च्या दबावाने येचुरींचे भाषण रद्द? 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 16 मार्च 2017

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांचे व्याख्यान ऐनवेळी रद्द केले आहे. कुलगुरूंच्या या निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेस, डावे व पुरोगामी चळवळीतील नेत्यांनी एकत्रित येऊन हे व्याख्यान कार्यक्रमानुसार करण्याची तयारी चालविली आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांचे व्याख्यान ऐनवेळी रद्द केले आहे.
कुलगुरूंच्या या निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेस, डावे व पुरोगामी चळवळीतील नेत्यांनी एकत्रित येऊन हे व्याख्यान कार्यक्रमानुसार करण्याची तयारी चालविली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही नेत्यांच्या दबावामुळे येचुरींचे भाषण रद्द केल्याचे बोलले जात आहे. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे येत्या 18 व 19 मार्चला "भारतीय लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने व उपाय' या
विषयावर दीक्षांत सभागृहात व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून निमंत्रण पत्रिकाही वितरित करण्यात आल्या आहेत. 

परंतु, ऐनवेळी कुलगुरू डॉ. सिध्दार्थविनायक काणे यांनी बुधवारला (ता. 15) एक पत्र जारी करून हा कार्यक्रमच रद्द केल्याचे म्हटले आहे. कुलगुरू कार्यालयातील हे
पत्र आयोजित आंबेडकर अध्यासनाला पाठविण्यात आले आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) डावे व उजव्या विचारसरणीच्या नेत्यांमध्ये वाद
निर्माण होत असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून नागपुरात हा कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले जात आहे. परंतु येचुरींच्या या व्याख्यानाला रा. स्व. संघातील
काहींनी विरोध केल्याने कुलगुरूंनी हा निर्णय घेतल्याचे कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी म्हटले. विद्यापीठातील रा. स्व. संघ व अभाविपचा वाढता
हस्तक्षेप योग्य नाही. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच घाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुलगुरूंच्या या निर्णयाच्या विरोधात डावे, कॉंग्रेस व पुरोगामी चळवळीतील
कार्यकर्ते एकत्र आले असून ते कुलगुरूंना निवेदन देणार आहेत. त्यामुळे येचुरींच्या भाषणावरून नागपुरात पुन्हा डावे व उजवे एकमेकांसमोर येणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख