Siren is used as alternative to red beacon | Sarkarnama

लालदिव्यावर आता सायरनचा उतारा...

महेश पांचाळ : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मे 2017

एखाद्या मंत्र्यांचा कार्यक्रम असलेल्या नियोजित ठिकाणी पोलीस नियंत्रण कक्षामार्फत आधीच मंत्र्याची गाडी कुठून जाणार याचे नियोजन वाहतुक विभागाकडून केले जात होते. त्यामुळे, सायरन वाजविण्याची वेळ येत नसे. आता लाल दिवा काढल्याने, मंत्र्यांची गाडी आहे हे दाखविण्यासाठी सायरनचा वापर केला जात आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका यांना सायरन वाजविण्याची परवानगी आहे. आता त्यात मंत्र्यांच्या गाड्याची भर पडली आहे. 

मुुंबई ता. 6: मंत्र्यांच्या गाडीवरील लालदिवा काढल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी आता सायरनचा वापर केला जात असून, ताफ्यापुढील पोलिसांच्या वाहनांवर पायलट ची पाटी ठळक अक्षरात दिसू लागली आहे.

मंत्र्यांच्या गाडीवरील लाल दिवा काढून टाकण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांनी लाल दिवा त्यागण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरात अनेकदा वाहतुकीची कोंडी असल्याने लाल दिवा असलेल्या मंत्र्यांच्या गाडीला मार्ग खुला करुन देण्याचे काम वाहतुक पोलिसांकडून केले जात होते.

 लाल दिवा काढल्याने मंत्र्यांच्या गाड्या आणि खाजगी गाड्यांमध्ये फरक दिसत नसल्याने मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्याही वाहतुकीच्या रांगेत अडकून बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, मंत्र्यांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनपुढे पायलट अशी ठळक अक्षरातील पाटी लक्ष वेधून घेवू लागली असून, या ताफ्यातील रुग्णवाहिकासह मंत्र्याच्या गाडीतील गेले अनेक वर्ष वापर होत नसलेल्या सायरनचा वापर रस्ता मोकळा व्हावा यासाठी केला जात आहे.

लाल दिवा हा स्टेटस सिम्बाल म्हणून मानला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयानंतर राज्यातील मंत्र्यांनी लाल दिवा गाडीवर वापर बंद केले असले तरी, अनेकदा कार्यक्रमाला जाताना खाजगी गाडी आणि मंत्र्यांची गाडी यांच्यातील फरक कळत नसल्याने मंत्र्यांच्या गाडीला पुढे जावू देण्यास कोणी तयार होत नाही.

त्यामुळे कार्यक्रम स्थळी पोहचण्यास उशिर होत असल्याचा अनुभव येत आहे. लाल दिवा नसला तरी वाहतुक यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिकांना मंत्र्यांची गाडी ओळखता आली पाहिजे, असे मत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.
राज्याच्या राजशिष्टचार विभाग, सामान्य प्रशासन विभागाकडून गर्दीतील अडकणाऱ्या मंत्र्यांच्या गाडीबाबत ठोस उपाययोजना करण्यात आली नसली तरी, ताफ्यातील पोलीसांनी आणि वाहन चालकांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.

ताफ्यातील पोलिस गणवेशात दिसत असून मंत्र्यांच्या गाडीच्या सर्वांत पुढे असलेल्या पोलीस व्हॅनवर पायलट नावाची पाटी ठळक अक्षरात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, यातूनही अनेकदा खाजगी वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढणे कठीण होवून बसत असल्याने आता मंत्र्यांच्या गाडीतील सायरनचा आवाज ऐकू येवू लागला आहे.
लाल दिवा असताना मंत्र्यांच्या गाडीत सायरन असायचा. परंतु, त्याचा वापर केला जात नसायचा. एखाद्या मंत्र्यांचा कार्यक्रम असलेल्या नियोजित ठिकाणी पोलीस नियंत्रण कक्षामार्फत आधीच मंत्र्याची गाडी कुठून जाणार याचे नियोजन वाहतुक विभागाकडून केले जात होते. त्यामुळे, सायरन वाजविण्याची वेळ येत नसे.

आता लाल दिवा काढल्याने, मंत्र्यांची गाडी आहे हे दाखविण्यासाठी सायरनचा वापर केला जात आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका यांना सायरन वाजविण्याची परवानगी आहे. आता त्यात मंत्र्यांच्या गाड्याची भर पडली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख