श्‍वेता सिंघल यांनी पाटणच्या तहसीलदारांचे अधिकार काढले

श्‍वेता सिंघल यांनी पाटणच्या तहसीलदारांचे अधिकार काढले

पाटण : पाटण तालुक्‍यात प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व कर्मचारी यांच्यातील संघर्षामुळे येथील तहसिल कार्यालयातील कामकाजाचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी पाटणच्या तहसिलदारांकडुन गौण खणिज, कुळकायदा व वतनी जमिनीच्या परवानगीचे अधिकार काढून घेतले आहेत. तसेच एकमेकांवर केलेल्या तक्रारींवरुन जिल्हाधिकाऱ्यांनी दोन नायब तहसिलदारांच्या बदल्याही केल्या आहेत. 

पाटण महसूल विभागात गेल्या दीड वर्षांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यातंर्गत मतभेद आहेत. वेळेत काम होत नसल्याने नागरीकांना हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे वेळ व पैसा नाहक खर्च होत होता. तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडुन सातबाऱ्यामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करताना खातेदारांची दमछाक होत होती. तहसिलदार व प्रांताधिकारी यांच्यात समन्वय नव्हता. तहसिलदार व नायब तहसिलदारांतील वाद व मतभेद चव्हाट्यावर आला होता. त्यातुन नायब तहसिलदारासह कर्मचारी वारंवार दीर्घ रजेवर जाण्याचे प्रमाण वाढले होते. 

अधिकारी व कर्मचारी यांच्यात संवाद कमी झाल्याने कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्याचे प्रकार वाढले होते. कुळकायदा, वतनी जमिन यांच्या परवानगीसाठी खातेदारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यातच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेल्या तक्रारींचा खच पडला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाला उशिरा शहाणपण सुचले असुन जिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसिलदार राजेश जाधव यांची सातारा मुख्यालयात व विजय माने यांची कराड प्रांताधिकारी कार्यालयात तडकाफडकी बदली केली आहे. पाटणच्या तहसिलदारांकडुन गौण खणिज, कुळकायदा व वतनी जमीनीच्या परवानगीचे अधिकार काढले घेतले आहेत. ते अधिकार प्रांताधिकारी यांच्याकडे वर्ग केले आहेत. गौण खणिज, कुळकायदा व वतनी जमीनीच्या परवानगी व गौण खनिज उत्खनन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना केलेली दिरंगाई तहसिलदारांना भोवली असल्याची चर्चा आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com