Silent Alliance of BJP-Congress exposed before Congress State President | Sarkarnama

श्रीगोंद्यात भाजप- काँग्रेसच्या छुप्या युतीचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसमोरच झाला गौप्यस्फोट

संजय आ. काटे 
सोमवार, 21 जानेवारी 2019

डीच वर्षापूर्वी श्रीगोंदे नगरपालिकेत मनोहर पोटे यांना नगराध्यक्ष करण्यात आपलाच हात होता, मीच त्यांना नगराध्यक्ष केले, अशी जाहीर कबुली खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या साक्षीने देत राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंद्यातील  काँग्रेस भाजपाची छुपी युती मान्य केल्याने खळबळ उडाली.

श्रीगोंदे (नगर) : अडीच वर्षापूर्वी श्रीगोंदे नगरपालिकेत मनोहर पोटे यांना नगराध्यक्ष करण्यात आपलाच हात होता, मीच त्यांना नगराध्यक्ष केले, अशी जाहीर कबुली खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या साक्षीने देत राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंद्यातील  काँग्रेस भाजपाची छुपी युती मान्य केल्याने खळबळ उडाली.

नगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या साक्षीने काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी भाजपचे नेते व  माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मानणाऱ्या श्रीगोंदे शहर विकास आघाडीला अडीच वर्षापूर्वी पाठिंबा दिल्याची जाहीर कबुली दिली. पाचपुते यांनी भाजपात प्रवेश केला, मात्र, त्यापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेल्या त्यांच्या नगरसेवकांना पक्षांतर करता आलेले नव्हते. परिणामी मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखाली नऊ नगरसेवकांच्या गटाने श्रीगोंदे शहर विकास आघाडीची गटनोंदणी करीत ही भाजपप्रणीत आघाडी स्थापन केली. 

त्यानंतर झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीत राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांना मानणाऱ्या काँग्रेसच्या फक्कड मोटे यांनी पोटे यांच्या विरुद्ध उमेदवारी केली. मात्र, नागवडे यांनी त्यांना मानणाऱ्या नगरसेवकांना पोटे यांच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश दिले. त्यात दोन नगरसेवकांनी काँग्रेस पक्षादेश डावलून थेट भाजप आघाडीच्या पोटे यांना मतदान केले. त्यावेळी नागवडे यांनी या नगरसेवकांनी आपले ऐकले नसल्याचा दावा केला होता. 

मात्र, आता पोटे यांना त्यावेळी मीच नगराध्यक्ष केले, हे जाहीर सभेत व लोकांना हात वरती करायला लावून कबूल केलं. म्हणजे भाजपप्रणीत आघाडीच्या पोटे यांना नगराध्यक्ष करताना काँग्रेसचे मोटे यांचा पराभव केला हेही मान्य केले. त्यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते. त्यांच्या साक्षीने नागवडे यांनी अप्रत्यक्षपणे श्रीगोंदयात त्यांची व भाजपची छुपी आघाडी होती हे मान्य केल्याने नवा वाद उफाळणार आहे. जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखण्याचे आवाहन करणाऱ्या चव्हाण यांना त्याच व्यासपीठावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपला कशी मदत केली, हेच जाहीर केल्याने पक्षशिस्त भंग झाल्याचा दावा काही कार्यकर्त्यांनी केला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख