Sidhudurga news - Rane's party limited to Kanakavali, says Vikrant Sawant | Sarkarnama

राणेंचा पक्ष कणकवलीपुरता मर्यादीत  : विक्रांत सावंत

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष फक्त कणकवलीपर्यतच मर्यादीत आहे. पक्ष स्थापन होवून पंधरा दिवस उलटले तरी कोणी बडा नेता या पक्षात आलेला नाही. यावरून त्यांच्या प्रवृत्तीमुळे पक्षाच्या विचारांना कोणी साथ देत नाही हे दिसून आले, अशी टिका शिवसेनेचे विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांनी आज येथे केली.

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष फक्त कणकवलीपर्यतच मर्यादीत आहे. पक्ष स्थापन होवून पंधरा दिवस उलटले तरी कोणी बडा नेता या पक्षात आलेला नाही. यावरून त्यांच्या प्रवृत्तीमुळे पक्षाच्या विचारांना कोणी साथ देत नाही हे दिसून आले, अशी टिका शिवसेनेचे विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांनी आज येथे केली.

दरम्यान राणेंच्या पक्षाला एनडीएत प्रवेश देण्यापुर्वी भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यपध्दतीचा इतिहास तपासावा. आवश्यक असल्यास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्याकडुन माहिती घ्यावी, असाही टोला यावेळी सावंत यांनी लगावला. 

श्री. सावंत यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ``राणेंनी पक्ष स्थापन करण्यापुर्वी आपल्यासोबत अनेक आमदार तसेच सर्वपक्षातील बलाढ्य पदाधिकारी असल्याचे जाहीर केले होते; मात्र ज्यादिवशी त्यांनी आपला पक्ष जाहीर केला त्या दिवशी माजी खासदार निलेश राणे यांच्यासोबत संदिप कुडतरकरांना बाजूला बसवावे लागले हे त्यांचे दुदैव आहे. पक्ष जाहीर झाल्यानंतर अनेक पदाधिकारी प्रवेश करतील, असे त्यांनी सांगितले होते; मात्र सद्यस्थिती लक्षात घेता कोणीही राणेंच्या पक्षात फिरकताना दिसत नाही. त्यामुळे त्याचा पक्ष फक्त कणकवलीपर्यंत मर्यादीत राहण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रवृत्तीला कोणी साथ देत नाही हे आता उघड होत आहे.''

ते पुढे म्हणाले, ``मी राजकारणात नवखा आहे. मला काही कळत नाही, असे सांगुन विरोधक माझ्यावर टिका करीत आहे; परंतु ही गोष्ट चांगली आहे. अशाच राजकारणामुळे माजगाव विकासापासुन मागे राहीले आहे. अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत; मात्र आता शिवसेनेच्या माध्यमातून गावाचा निश्‍चितच विकास केला जाणार आहे. त्या ठिकाणी देण्यात आलेले सर्व उमेदवार ग्रामस्थांशी चर्चा करुनच निवडण्यात आले आहे. सरपंचपदाचे उमेदवार दिनेश सावंत हे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर निश्‍चितच लोक विश्‍वास ठेवणार आहे. आमच्याकडे पालकमंत्री, खासदार आहेत. तर समर्थकांकडे आठ महिन्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद आहे. त्यामुळे कोण विकास करणार हे लोकांनीच ठरवावे.''

श्री. सावंत पुढे म्हणाले, ``वेंगुर्ले आणि दोडामार्गची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली आहे. त्याठिकाणी निश्‍चितच यश मिळणार आहे; मात्र राणे समर्थकांचे पॅनल दुहेरी आकडा गाठू शकणार नाही तर सावंतवाडीत गाव पॅनलमधून आलेले सरपंच आपले असल्याचा दावा समर्थकांना करण्याची वेळ आली आहे.''

संजू परब यांना चहापानाचे आमंत्रण
यावेळी श्री. सावंत यांनी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी माजगावात दोन दिवस ठाण मांडणार या वक्तव्याला उत्तर दिले. ते म्हणाले, ``माजगाव येथे परब यांनी नक्कीच यावे. त्यांचा उमेदवार तीन नंबरला फेकला गेला आहे. त्यामुळे त्यांना याठिकाणी यावेच लागणार आहे. ते आल्यास आम्ही त्यांचे चहापान देवून स्वागत करू, तशी आमची संस्कृती आहे.''

``त्या'' टिकेबद्दल आता काय बोलणार

विक्रांत आणि विकास सावंत हे दोघे पितापुत्र वेगवेगळ्या पक्षात असल्याचे कारण पुढे करुन विरोधकांकडुन त्यांच्यावर टिका करण्यात येत आहे. त्याला श्री. सावंत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ``आम्ही दोघे एकाच घरात राहतो. दोन्ही पक्षांच्या नेत्याशी आमचे चांगले संबंध आहेत. आता नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यांनी नितेश यांना आपल्या पक्षात आणावे.''
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख