भाजपची सत्ता जाताच श्यामसुंदर शिंदेंनी पलटी मारली!

श्यामसुंदर शिंदे हे नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
shyamsundar shinde news
shyamsundar shinde news

पुणे: शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून आल्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणारे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपची सत्ता जाताच पलटी मारली आहे. त्यांनी शरद पवार यांना भेटून आपला पाठिंबा महाआघाडीला जाहीर केला आहे. 

श्यामसुंदर शिंदे हे नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघातून निवडून आले आहेत. या मतदारसंघात वंचित आघाडीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

श्यामसुंदर शिंदे हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत. ते नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेहुणे आहेत. मुळात लोहा मतदारंसघ हा प्रताप पाटील चिखलीकरांचा बालेकिल्ला आहे. ते अनेक वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेच्यावतीने निवडून आले होते. मात्र काही दिवसांतच त्यांचे शिवसेनेशी बिनसले आणि त्यांनी भाजपशी जवळीक केली. ते तांत्रिकदृष्टया शिवसेनेत असलेतरी ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम करत होते. 

नांदेड महापालिका निवडणुकीच्यावेळी चिखलीकरांनी भाजपचे काम केले होते. त्याचवेळी शिवसेनेने भाजपच्या मुक्तेश्वर धोंडगेंना पक्षात घेतले. पुढे लोकसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने शिवसेनेशी समन्वय करून नांदेड मतदारसंघात प्रताप पाटील चिखलीकरांना उमेदवारी दिली. ते अशोक चव्हाण यांना पराभव करून निवडून आले. 

आता विधानसभा निवडणुकीत लोहा मतदारसंघात भाजपच्यावतीने आपल्या मुलाला तिकीट मिळावे यासाठी प्रताप पाटील चिखलीकरांचा प्रयत्न होता. महायुतीत जागा भाजपला सुटावी म्हणून त्यांनी जंग जंग पछाडले, मात्र ते शक्य झाले नाही. शिवसेनेने जागा सोडली नाही, मुक्तेश्वर धोंडगे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून श्यामसुंदर शिंदे यांना रिंगणात उतरवले गेले. 

हा मतदारसंघ पुर्वी शेकापच्या बालेकिल्ला होता, त्यामुळे चिखलीकरांनी श्यामसुंदर शिंदे यांच्यासाठी शेकापचे तिकीट आणले, तसेच 64 हजारांच्या मताधिक्क्याने विजयीही झाले. शिवसेनेचे धोंडगे तिसऱ्या क्रमांकावर गेले. 

शेकाप हा स्वतंत्र विचारधारा असलेला पक्ष यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत आहे. मात्र शिंदे हे भाजपच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने निवडून आले असल्याने त्यांनी पक्षाला न विचारता देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला होता. त्यावरून शेकापमध्ये चर्चा झाली होती, मात्र शिंदे भाजपची साथ सोडायला तयार नव्हते, मात्र गेल्या तीन चार दिवसांतील नाट्यमय घडामोडीनंतर आज दुपारी फडणवीस सरकार कोसळले तशी शिंदे यांना आपल्या पक्षाची आठवण झाली. सरकार कोसळताच त्यांनी शरद पवार यांची भेट घेत आपण काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर असल्याचे सांगितले. ही माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदारांच्या बैठकीत दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com