पक्षापुढे भाऊ, मित्र, सहकाऱ्यांची तमा बाळगणार नाही : शशिकांत शिंदे

शशिकांत शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. ते म्हणाले, "देर आए, दुरुस्त आए...' असे सांगत त्यांनी जावळी तालुक्‍यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील सत्तेबाबतची भुमिकाही स्पष्ट करताना त्यांनी आता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत असे सांगितले.
 पक्षापुढे भाऊ, मित्र, सहकाऱ्यांची तमा बाळगणार नाही : शशिकांत शिंदे

कुडाळ (ता. जावली) : कुडाळ गटाची पोटनिवडणूक बिनविरोधच अपेक्षित होती. मात्र ही निवडणूक लादली असून राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक पवार यांचा विजय निश्‍चित आहे. शशिकांत शिंदेंची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे. मी आजपर्यंत पक्षाच्या भूमिकेशी कधीही तडजोड केलेली नाही. यापुढेही करणार नाही. वेळप्रसंगी भाऊ, मित्र, सहकारी कोणाचीही तमा बाळगणार नाही, असा सूचक इशारा सातारा, जावली व कोरेगाव तालुक्‍यातील विरोधकांना त्यांनी दिला. 

कुडाळ गटाच्या पोटनिवडणुकीसाठी कुडाळ येथे आयोजित प्रचारसभेत शशिकांत शिंदे बोलत होते. ते म्हणाले, ""दीपक पवारांनी सत्ताधारी पक्षाला व पदाला लाथ मारून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे पक्षाकडून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. या पोटनिवडणुकीच्या विजयानंतर त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे जावलीतील विकासकामांसाठी यानिमित्ताने तगडा नेता लाभणार आहे. मी आजपर्यंत पक्षाच्या भूमिकेशी तडजोड केलेली नाही. यापुढेही करणार नाही. वेळप्रसंगी भाऊ, मित्र, सहकारी कोणाचीही तमा बाळगणार नाही. ही लढाई केवळ दीपक पवारांची नसून माझी किंबहुना राष्ट्रवादी पक्षाची आहे. त्यामुळे दीपक पवारांचा ऐतिहासिक विजय करून शरद पवार यांना वाढदिवसाची भेट द्या, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. 

विरोधकांकडून माझ्या भूमिकेबाबत शंकेचे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. पक्षाच्या विरोधात जर कोणी, काही करत असेल तर त्याच्या विरोधात मला उभे रहावेच लागेल. शरद पवारांनी माझ्या राजकीय वाटचालीसाठी मनापासून ताकद देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यामुळे माझा नेता माझे योग्य पुनर्वसन करणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनीही नव्या जोषाने कामाला लागावे. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, मोहनराव शिंदे, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे, कुडाळचे उपसरपंच गणपत कुंभार, सुधीर पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

हिशोब चुकते करायचे 
शशिकांत शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. ते म्हणाले, "देर आए, दुरुस्त आए...' असे सांगत त्यांनी जावळी तालुक्‍यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील सत्तेबाबतची भुमिकाही स्पष्ट करताना त्यांनी आता सर्वांचेच हिशोब चुकते करायचे आहेत असे सांगितले. त्यांच्या या विधानाची चर्चा मात्र तालुक्‍यात चांगलीच रंगली आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्‍यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा संघर्ष पहावयास मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तसेच या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या उसाचा, कामगारांचा, साखर कारखान्याचा विषय हातात घेऊन तालुक्‍यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वत: पुढाकार घेणार असल्याचेही सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com