shrirang barane criticise laxman jagtap | Sarkarnama

लक्ष्मण जगताप भ्रष्टाचार- गुन्हेगारीवर ब्र शब्दही कां काढत नाहीत?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

जगताप यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर केव्हाही बैठक बोलवावी.

पिंपरीः भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी जनतेने सत्ता दिली. पण त्यांनी शहर भकास केले, असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज केला. त्यामुळे कट्टर राजकीय वैरी असलेल्या या आमदार भाऊ आणि खासदार अप्पा यांच्यातील कलगीतुरा सलग पाचव्या दिवशीही सुरुच राहिला आहे.

विकासाच्या मुद्द्यावर बोला असे आव्हान जगताप यांनी बारणे यांना दिले होते. त्याचा बारणेंनी समाचार घेतला. अग्र क्रमांकावरील शहर कोणत्या क्रमांकावर नेऊन ठेवले हे यांना तरी ठाऊक आहे काय ? असा प्रश्न विचारत सत्ता तुमच्याकडे आहे, शहरातील गुन्हेगारी, कचरा, पाणी, हातगाड्यांची अतिक्रमणे यावर जगताप यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर केव्हाही बैठक बोलवावी. त्या बैठकीस उपस्थित राहून शहराच्या हितासाठी नागरिकांचे प्रश्न निश्चित मांडू, असे प्रत्युत्तर बारणे यांनी दिले. गेल्या चौदा वर्षात चौदा वेळाही विधानसभेत तोंड न उघलेले मौनी आमदार जगताप भ्रष्टाचार, वाढती गुन्हेगारी, याबाबत ब्र शब्दही काढत नसल्याचे ते म्हणाले.

बारणे म्हणाले, पत्रकबाजी मी सुरु केली नाही तर माझ्या आकुर्डी येथील कार्यक्रमाच्या आलेल्या बातम्यामधुन जगताप यांनी सुरुवात केली आहे. हा त्यांचा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे. या अगोदरच्या अनेक वर्षापुर्वीच्या बातम्या काढल्या तर कोण टीका करतो आणि कोण पत्रक काढून खालच्या भाषेचा वापर करतो. हे पिंपरी चिंचवड शहरातील जनतेला माहित आहे. पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या गुन्हेगारी बाबत मी स्वत: पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालक यांना पत्र दिले आहे. ज्यांचे फोटो गुन्हेगाराबरोबर खुलेआम फ्लेक्स वर लावले जातात. कोण गुन्हेगाराचा पाठीराखा आहे. हे जनतेला ठाऊक आहे. मावळ लोकसभेच्या विकासाबाबत व माझ्या कामाबाबत मावळ लोकसभेची जनता सामाधानी आहे. मला जगतापांच्या सर्टीफिकेटची आवश्यकता नाही. कोण जमिनी बळकावतो व कोणाचा जमिनी घेण्याचा धंदा आहे, हे देखील जनता जाणते आहे. जनता एवढी दुधखुळी नाही. त्यांच्यासारखी भ्रष्टाचाराची पट्टी जनतेने डोळ्यावर ओढलेली नाही. महापालिकेची सत्ता उबवायला नाही तर राबवायला दिली आहे. हे महाशय यामध्ये पुरते अपयशी ठरल्यानेच नको ते आरोप करून मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यासाठी पत्रकबाजी करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख