shrigonda council president post change politics | Sarkarnama

श्रीगोंदे नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या पदाला तूर्त धक्‍का नाही! 

संजय आ. काटे 
सोमवार, 30 जुलै 2018

नगराध्यक्ष मनोहर पोटे व पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम लगड यांना हटविण्याच्या हालचाली सुरु असल्या, तरी या दोघांनाही तुर्त दिलासा मिळाल्याची माहिती आहे.

श्रीगोंदे (जि. नगर) : नगराध्यक्ष मनोहर पोटे व पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम लगड यांना हटविण्याच्या हालचाली सुरु असल्या, तरी या दोघांनाही तुर्त दिलासा मिळाल्याची माहिती आहे. आज नगरसेवक व भाजपाच्या नेत्यांच्या बैठकीत वादावादी झाली, मात्र तुर्त नको नंतर नेते एकत्रीत निर्णय घेतील असे ठरल्याचे समजले. 

पोटे व लगड यांना हटवून त्यांच्या जागी ठरल्याप्रमाणे नाना कोथिंबीरे व शहाजी हिरवे यांना संधी देण्याच्या हालचाली काही महिन्यांपासून सुरु होत्या. त्यासाठी शिष्टमंडळांनी नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. त्यावर आज शहरातील माऊली निवासस्थानी बैठक झाली. माजीमंत्री बबनराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, बाबासाहेब भोस यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी सखोल चर्चा केली. काहींनी पोटे यांच्या कामाच्या पध्दतीवर नाराजी व्यक्त करीत आता कोथिंबीरे यांना उर्वरित काळात संधी देण्याचा गळ नेत्यांना घातली. काहींनी मात्र पोटे हेच सध्या तेथे योग्य असल्याचे सांगत नेत्यांना संकटात टाकले. कामाच्याबाबतील काही सूचना पोटे यांना करीत नेत्यांनी हा विषय तुर्त बंद करुन एकीने रहा असा सल्ला दिल्याचे समजले. बबनराव पाचपुते व भोस हे यावर निर्णय घेतील तो सगळ्यांनी मान्य करण्याचे ठरले. 

 भोस यांना विचारले असता ते म्हणाले, बदलीपेक्षा इतर काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. पाचपुते व मला दोन्ही ठिकाणी इतरांना संधी देण्याबाबत अधिकार देण्यात आले असुन, नगराध्यक्ष व सभापती बदलले जातील मात्र त्यासाठी काही वेळ देण्याचे ठरले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख