Shridi fight in Prestigious for Vikha and Thorat | Sarkarnama

शिर्डीची लढाई विखे-थोरातांच्या प्रतिष्ठेची  

- अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील 
शनिवार, 27 एप्रिल 2019

नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या प्रतिष्ठेला पणाला लावणारी निवडणूक म्हणून शिर्डी मतदारसंघाकडे पाहिले जाते. उमेदवार लोखंडे आणि कांबळेंनी जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे. वाकचौरेंच्या उमेदवारीने लढतीला तिसरा आयाम मिळालाय. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन मातब्बर नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. खासदार सदाशिव लोखंडे (शिवसेना) आणि आमदार भाऊसाहेब कांबळे (कॉंग्रेस) यांच्यातच सामना रंगलाय. लोखंडेंना विखेंचे तर कांबळेंना थोरातांचे खंबीर पाठबळ आहे. त्यातच माजी खासदार आणि भाजपचे नेते भाऊसाहेब वाकचौरे यांनीही मतदारसंघात तिसरे आव्हान निर्माण केलंय. वाकचौरेंची बंडखोरी कोणाला फायदेशीर ठरणार, की दोघांच्या मतविभाजनात तेच बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

नगर मतदारसंघाची निवडणूक संपल्यानंतर शिर्डीत प्रचाराचा धुराळा उडायलाय. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची सभा थोरातांनी ताकद लावून संगमनेरला घेतली. याशिवाय ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नाना पटोले या नेत्यांच्याही सभांमुळे शेवटच्या आठवड्यात प्रचारात रंगत आली. 
संगमनेरमध्ये कांबळेंच्या मताधिक्‍यासाठी थोरातांनी सर्वस्व पणाला लावले. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून लोखंडेंसाठी विखेंनी कंबर कसली आहे. कोपरगावात आमदार स्नेहलता कोल्हे आणि आशुतोष काळे यांनी अनुक्रमे लोखंडे व कांबळे यांच्या प्रचाराची मोहीम चालवली आहे. अकोल्यात मधुकर आणि वैभव पिचड यांनी कांबळेंसाठी रणनीती आखली असून, त्यांना शह देत लोखंडेंच्या मताधिक्‍यासाठी भाजप-शिवसेना सरसावली आहे. अकोले वाकचौरेंचे होमपीच असल्याने त्यांना तेथे मताधिक्‍याची अपेक्षा आहे.

श्रीरामपूरमधून कांबळेंना स्वतःचा तालुका असल्याने मताधिक्‍य मिळेल. परंतु विखे आणि ससाणे समर्थकांच्या विरोधाचा सामनाही करावा लागेल. नेवासे तालुक्‍यातून ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी कांबळेंची पाठराखण केली आहे. तेथील भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी लोखंडेंना मदतीचा हात दिलाय. वाकचौरे मात्र सर्व सहा विधानसभा मतदारसंघांत जुन्या संपर्काच्या बळावर नशीब अजमावीत आहेत. 

मतदारसंघातील प्रश्‍न 
- निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे वर्षानुवर्षे रखडलेली 
- समृद्धी महामार्गाशी निगडित भूसंपादन, इतर प्रश्‍न रखडले 
- श्रीरामपूरसह तीन तालुक्‍यांत खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा वाद 
- "मुळा'च्या लाभक्षेत्रात अखेरपर्यंत कालवे पोचले, परंतु पाणी नाही 
- नगर-कोपरगाव राज्यमार्गाचे सहापदरीकरण रखडले 
- शिर्डी-नाशिक लोहमार्गाची अनेक वर्षांपासूनची मागणी 
- गोदावरी खोऱ्यात पश्‍चिमेकडील पाणी वळवण्याचा प्रस्ताव 

उमेदवारांची बलस्थाने 
सदाशिव लोखंडे 
- राधाकृष्ण विखेंचे खंबीर पाठबळ 
- भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांची साथ 
- नेवाशात भाजप आमदार मुरकुटे यांचा जोर 

भाऊसाहेब कांबळे 
- बाळासाहेब थोरात यांचे पाठबळ 
- मधुकर आणि वैभव पिचड यांची साथ 
- श्रीरामपूरच्या होमपीचवर मताधिक्‍याची अपेक्षा 

भाऊसाहेब वाकचौरे 
- माजी खासदार म्हणून सुपरिचित 
- अकोले तालुक्‍यातून मताधिक्‍याची अपेक्षा 
- उच्चशिक्षित असल्याचा फायदा अपेक्षित 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख