Should Prithviraj and Ashok Chavan work under Thackeray as minister? | Sarkarnama

पृथ्वीराज आणि अशोक चव्हाणांनी मंत्री म्हणून ठाकरेंच्या हाताखाली काम करावे?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 4 डिसेंबर 2019

माजी मुख्यमंत्र्यांनी नव्या सरकारमध्ये साधे मंत्री म्हणून सहभागी व्हावे काय, या प्रश्नाचे उत्तर इतिहासात डोकावून पाहिल्यास होय म्हणून मिळते.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धधव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कॉंंग्रेसला तिय्यम दर्जाची मंत्रीपदे मिळून उपयोग काय, असा प्रश्‍न पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचे समजते.

संख्याबळामुळे आपले स्थान तिसरे असले तरी आपल्यामुळे सरकार प्रत्यक्षात आले आहे, याची जाण ठेवायला हवी. हे लक्षात आणून देण्यात आले आहे. कॉंग्रेसमधील तरुण नेत्यांना संधी मिळावी. नेहमी ज्येष्ठांना संधी देणे कितपत योग्य असल्याचा प्रश्‍नही करण्यात आला आहे. काॅंग्रेसच्या कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, यावरून बराच खल सुरू आहे. 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यायचे काय, या प्रश्‍नाचेही उत्तर अदयाप समोर आलेले नाही. मुख्यमंत्रिपद सांभाळलेल्या नेत्यांनी पुन्हा कुणाच्या हाताखाली काम करावे काय, असा सवालही काही नेत्यांनी केला. येत्या काही दिवसात या विषयावर चर्चा होत राहील, असे समजते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समावेशाबददलही साशंकता आहे. या बड्या नेत्यांचा समावेश केल्यास त्यांना महत्त्वाचे खाते द्यावे लागेल. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी दयावी ही मागणी पुढे आली आहे.

मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही, याचे उदाहरण महाराष्ट्रातच घडले आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे 1985 मध्ये काही महिन्यांसाठी मुख्यमंत्री झाले होते. ते सर्वोच्च स्थानावर पोहोचूनही 2003 मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री म्हणून राहिले होते. असेच उदाहरण शंकरराव चव्हाण यांचेही आहे. शंकरराव हे 1997 ते 77 या काळात राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र नंतर शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे काॅंग्रेसकडे असलेल्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्री म्हणून राहता येऊ शकते, अशी परंपरा आहे.

अशोक चव्हाण यांच्यावर `आदर्श`च्या चौकशीची टांगती तलवार आहे. पृथ्वीराज यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद द्यावे, असे नियोजन होते. मात्र ते आता नाना पटोले यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील चांगले खाते मिळविण्यासाठी काॅंग्रेस नेत्यांना वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख