पुरंदरचे "कावळे' आणि भोरचे "डोमकावळे'..... 

भोरमधील शेतकऱ्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून तांत्रिक सल्लागार समितीच्या अहवालाची प्रत मिळवली. त्यानंतर या गोष्टी उघड झाल्या. संग्राम थोपटे यांना संपूर्ण माहिती कशी मिळाली यासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सातारा येथे काही शासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले असल्याचेही समजते.
पुरंदरचे "कावळे' आणि भोरचे "डोमकावळे'..... 

भोर : वेल्हे तालुक्‍यातील गुंजवणी-चापेट धरणाच्या पाण्यावरून जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यामधील राजकीय वाद रंगला आहे. दोघांच्या एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपाने वातावरण तापले असून गुंजवणीचे पाणी पेटल्याची जाणीव जनतेला झाली आहे. 

दोघेही नेते आपल्या मतदारसंघासातील जनतेला पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे हे गुंजवणीचे पाणी बंद पाईपमधून पुरंदर तालुक्‍याला नेण्यासाठी धावपळ करीत आहे. आमदार संग्राम थोपटेही त्यास विरोध करीत नाहीत. परंतु पुरंदरला बंद पाईपलाईन मधून पाणी नेताना तांत्रिक सल्लागार समितीने गुंजवणी प्रकल्पाच्या मूळ अहवालात बदल करून घातलेल्या नवीन अटींना विरोध केला आहे. 

नवीन अहवालात भोर-वेल्ह्यातील मूळ पीकपध्दती बदलली आहे. भातपिकास पाणी देण्यासाठी फक्त ठिबक सिंचनच वापरावे आणि गहू, हरभरा व ज्वारी ही पिके घ्यावयाची नाहीत. असा शोध अहवालात लावण्यात आला आहे. भोर-वेल्ह्यातील अनेक पाणीयोजनाही यामुळे बंद होतील. याशिवाय गुंजवणी वीजनिर्मिती प्रकल्प रद्द केल्याने शासनाचे दरवर्षी 4 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. यास संग्राम थोपटे यांनी विरोध केला आहे.

 
भोरमधील शेतकऱ्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून तांत्रिक सल्लागार समितीच्या अहवालाची प्रत मिळवली. त्यानंतर या गोष्टी उघड झाल्या. संग्राम थोपटे यांना संपूर्ण माहिती कशी मिळाली यासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सातारा येथे काही शासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले असल्याचेही समजते. 

गुंजवणी प्रकल्पाच्या कामात आमदार संग्राम थोपटे अथडळा आणीत असल्याचा आरोप विजय शिवतारे करीत आहेत. भोर-वेल्ह्याच्या हक्काचे पाणी गेली 15 वर्षे पळविले. त्यावेळी थोपटे गप्प राहिले आणि आता पुनर्वसनातल्या घेतलेल्या जमिनी हडप करण्यासाठी व आपली पापे झाकण्यासाठी विरोध करीत असल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी केला. याखेरीज संग्राम थोपटे मावळे नसून डोमकावळे असल्याचा आरोपही शिवतारे यांनी केला. यावर आमदार थोपटे यांनी भोर-वेल्ह्याच्या विकासासाठी मोडेल पण वाकणार नाही. असा पवित्रा घेत राज्यमंत्री विजय शिवतारे यांना प्रतिउत्तर दिले. 

""तीन वर्षांत विजय शिवतारे यांना पुरंदरमध्ये काहीही ठोस काम करता आले नाही. आता पुढील निवडणुकीला जनतेला तोंड दाखविण्यासाठी मी काम करतो असे दाखवित आहेत. आमच्यावर अन्याय करून आणि आरोप करून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा ते केविलवाना प्रयत्न ते करीत आहेत,' असा आरोप संग्राम थोपटे यांनी केला. 
थोपटे व शिवतारे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत बसण्यपेक्षा एकत्र बसून वाद मिटवावा. वेल्हे, भोर व पुरंदर या तीन्ही तालुक्‍यांना व्यवस्थितपणे पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावा, असे सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे.

पुरंदरला पाणी देण्याविषयी भोर-वेल्ह्यातील जनतेचा विरोध नाही. परंतु पाणी नेताना भोर-वेल्ह्यावर अन्याय होणार नाही. यासाठी दोघांना एकत्रित बसून मार्ग काढावा लागेल. सध्या गुंजवणीचे काम पूर्ण झाले असूनही पुनर्वसनाची कामे अपूर्ण असल्याने हरित लवादाच्या आदेशानुसार पाणी साठवता येत नाही. पुरंदरला पाणी नेताना नवीन अहवालात भोर-वेल्ह्यातील शेतकऱ्यांवर लादण्यात आलेल्या अटी रद्द केल्या. तरच पुरंदरला पाणी मिळेल. पुढील 2019 च्या निवडणुकीपूर्वी हे प्रकरण मिटले नाही तर दोघांनाही निवडणूक सोईस्कर जाणार नसल्याचेही नागरिकांचे मत आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com