shivsrushti pune | Sarkarnama

शिवसृष्टी - पुणेमेट्रोचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या दरबारात !

उमेश घोंगडे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

आता अंतिम निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पुणेकरांच्या भावना शिवसृष्टीशी जोडल्या गेल्या आहेत. दुसरीकडे मेट्रो प्रकल्पदेखील पुणेकरांसाठीच आहे. त्यामुळे यातून योग्य असा मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. या पार्श्‍वभूमीवर या जागेत मेट्रो आणि शिवसृष्टी हे दोन्ही प्रकल्प कसे उभारता येतील याबाबत पुन्हा नव्याने पाहणी करण्याची सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेला दिले आहेत. 

पुणे : कोथरूड येथील कचरा डेपोच्या सुमारे 27 एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याच्या पूर्वनियोजित प्रकल्पात मेट्रो स्टेशन उभारण्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला असून त्या जागेवर शिवसृष्टीच झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. या प्रश्‍नावरून आता राज्य सरकारची कोंडी झाली आहे. मेट्रो प्रकल्पदेखील तितकाच महत्वाचा असून शिवसृष्टीबरोबरच मेट्रो स्टेशन उभे राहिले अशी सरकारची भूमिका आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक होणार असून मध्यममार्ग काढण्यासाठी हा विषयाचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात होणार आहे. 

कोथरूडच्या सुमारे 27 एकर जागेत शिवसृष्टीच्या प्रकल्पाला मान्यता मिळून सुमारे 10 वर्षे उलटली. दरम्यानच्या काळात पुण्यात मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. मेट्रोच्या नियोजनाप्रमाणे कोथरूडच्या या जागेत मेट्रो स्टेशन उभारण्याचे नियोजन झाले. या नियोजनाला बहुतांश नगरसेवकांचा सुरवातीपासूनच विरोध होता. मात्र आता मेट्रोचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. वनाज ते रामवाडी या मार्गाचे भूमिपूजन गेल्या आठवड्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्यामुळे या जागेतील मेट्रो स्टेशनबाबत लवकर निर्णय होणे आवश्‍यक आहे. 

या संदर्भातील चर्चा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही झाली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या ठिकाणी संपूर्ण जागेत शिवसृष्टी झाली पाहिजे अशी भूमिका घेतली. या प्रश्‍नातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सभागृहात सांगितले. महामेट्रोचे आधिकारी, महापालिकेचे पदाधिकारी, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसृष्टीचा प्रकल्प गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. 

आता अंतिम निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पुणेकरांच्या भावना शिवसृष्टीशी जोडल्या गेल्या आहेत. दुसरीकडे मेट्रो प्रकल्पदेखील पुणेकरांसाठीच आहे. त्यामुळे यातून योग्य असा मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. या पार्श्‍वभूमीवर या जागेत मेट्रो आणि शिवसृष्टी हे दोन्ही प्रकल्प कसे उभारता येतील याबाबत पुन्हा नव्याने पाहणी करण्याची सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेला दिले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख