Shivsena's Sanjay Raut Criticises Narendra Modi over Combined Polls | Sarkarnama

मोदींच्या मनात आले तर, अमेरिका अन्‌ रशिया सोबतही निवडणुका घेतील : संजय राऊत 

संपत देवगिरे 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

शिवसेना हा टक्कर देणारा, डरकाळी फोडणारा पक्ष आहे. आम्ही कधीच निवडणुकांना घाबरत नाही. शिवसेनेची एकत्र निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी आहे. मात्र, त्यासाठी काही आचारसंहिताही ठरवावी - संजय राऊत

नाशिक : ''नरेंद्र मोदींनी मनात आणले तर लोकसभा, विधानसभाच काय अमेरिका अन्‌ रशिया बरोबर देखील ते निवडणुका घेतील. मात्र त्यात देशहीत काय आहे? एकत्र निवडणुका काय लोकांची एकाच वेळी फसवणुक करायला घ्यायच्या आहेत काय?'', असा प्रश्‍न शिवसेना नेते, खसादार संजय राऊत यांनी मोंदींना उद्देशून विचारला आहे. 

खासदार राऊत आज नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी ते म्हणाले, "शिवसेना हा टक्कर देणारा, डरकाळी फोडणारा पक्ष आहे. आम्ही कधीच निवडणुकांना घाबरत नाही. शिवसेनेची एकत्र निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी आहे. मात्र, त्यासाठी काही आचारसंहिताही ठरवावी. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रचारात भाग घेऊ नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुका ही भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे, असे म्हटले होते. निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैशांचा वापर होतो. सत्तादारी पक्ष त्याचा लाभ घेतो," पूर्वी काँग्रेसला त्याचा फायदा होत होता. आता भाजपला त्याचा वापर होतो आहे असा आरोप त्यांनी केला. 

ते पुढे म्हणाले, "अशा अनेक घोषणा भाजपने केल्या आहेत. त्याचे काय झाले. 'एक देश, एक विधान', 'एक देश, एक संविधान', समान नागरी कायदा याचे काय झाले? 2014 आणि 2019 मध्ये फरक आहे. एकच घोषणा वारंवार, प्रसिध्दीचे तंत्र, प्रचारात गोबेल्सचे तंत्र याला लोक किती वेळा भुलणार? त्यामुळे भाजपला पूर्वीसारखे यश मिळेल हे स्वप्न त्यांनी विसरावे." शिवसेना कोणत्याही आघाडीवर विश्‍वास ठेवत नाही. आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू, असेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख