शिवसेना नेते दिलीप दातीर यांनी दिले भाजप आमदार सीमा हिरेंना आव्हान

भाजपने उमेदवार दिल्याने प्रभाग सभापतीपद हुकलेले शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी आता थेट भाजपलाच आव्हान दिले आहे. नाशिक पश्‍चिम मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे विद्यमान आमदार आहेत. मात्र, भाजपला सत्ता देऊनही प्रश्‍न सुटले नाहीत. त्यामुळे आपण विधानसभा निवडणूक लढणारच अशी घोषणा नगरसेवक दातीर यांनी केली.
शिवसेना नेते दिलीप दातीर यांनी दिले भाजप आमदार सीमा हिरेंना आव्हान

नाशिक : भाजपने उमेदवार दिल्याने प्रभाग सभापतीपद हुकलेले शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी आता थेट भाजपलाच आव्हान दिले आहे. नाशिक पश्‍चिम मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे विद्यमान आमदार आहेत. मात्र, भाजपला सत्ता देऊनही प्रश्‍न सुटले नाहीत. त्यामुळे आपण विधानसभा निवडणूक लढणारच अशी घोषणा नगरसेवक दातीर यांनी केली. यामुळे निवडणुकीआधीच नाशिक पश्‍चिम मतदारसंघातील युतीतील घटक पक्षांच्या इच्छुकांत वातावरण तापले आहे. 

सातपूर प्रभाग सभापती निवडणुकीत संधी न मिळाल्याने आपण नाराज असल्याचे वृत्त सोशल मीडिया व काही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले. मात्र, यापूर्वी आपण सभागृह नेतेपदासारखे मोठे पद भूषविले असल्याने आणि सभापतिपदासाठी नामनिर्देशन पत्रच दाखल केलेले नसल्याने निवडणुकीच्या क्षणी नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असा खुलासा नगरसेवक दिलीप दातीर यांनी केला. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक पक्षाच्या झेंड्याखाली लढविण्याचा मनोदय असल्याचे व तशी प्रबळ दावेदारी पक्षाकडे केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

यासंदर्भात नगरसेवक दातीर यांनी पत्रकार परिषद घेतली. एक गट दातीर यांच्या बाजूने, तर दुसरा विरोधात आहे. दातीर यांनी पश्‍चिम विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने शिवसेना याबाबत काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. यावेळी ते म्हणाले, नाशिककरांनी यापूर्वी झालेल्या विधानसभा, महापालिका, लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश दिले. मात्र, तीन-तीन आमदार असूनही नाशिकच्या विकासाला अपेक्षित गती आणि नाशिककरांना न्याय मिळू शकला नाही. छोट्या-छोट्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याऐवजी त्यात गोंधळ निर्माण करून संभ्रमावस्था निर्माण केली गेली. औद्योगिक क्षेत्रात 60 टक्के कारखान्यांना घरघर लागली आहे. स्थानिक नेतृत्वाच्या अनास्थेमुळे नाशिकचा विकास खुंटला आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकची अवस्था विचित्र झाली आहे. हे चित्र बदलण्याकरिता आपण पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केल्याचे सांगून दातीर यांनी आपण विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. 

शिवसेनेकडून आपण नाशिक पश्‍चिम विधानसभा निवडणूक लढणार आहोत. पक्ष आपल्या कार्याचा विचार करून तिकीट देईल याची खात्री आहे. शिवसेना पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाचा आपल्या मनात विचार नाही. 
- दिलीप दातीर, नगरसेवक, शिवसेना 

शिवसेनेत विधानसभा निवडणुकीचे तिकीट कोणाला द्यायचे, याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतला जातो. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच अंतिम निर्णय घेत असतात. 
- सुधाकर बडगुजर, नगरसेवक, शिवसेना 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com