शिवसेना गृह ,महसूल,नगरविकास खात्यांबाबत आग्रही राहणार 

मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर उपमुख्यमंत्रीपदासह मंत्रीमंडळात पन्नास टक्‍के वाटा मागण्याची शिवसेनेन तयारी सुरू केली आहे. तसेच गृह, नगरविकास, गृहनिर्माण महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम अशी कॅबिनेट खाती पदरात पाडून घेण्यास शिवसेना सरसावली आहे.
Uddhav Thakre
Uddhav Thakre

मुंबई :  विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना- भाजप युतीत सत्तास्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्याने यंदाच्या सत्तेत शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. याबाबतचे संकेतही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत असतानाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसचे नेते शिवसेनेला पाठींबा देण्याच्या मनस्थितीत होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनुसार शिवसेना भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

 त्यामुळे ऐन  दिवाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठकांचा सिलसीला सुरू होणार आहे. तसेच दिवाळीच्या दरम्यानच किंवा संपल्यानंतर लगेच सत्तास्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यपालांची भेट घेणार असून सत्तेचा दावा करणार आहेत.

सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला सत्तेत न्याय वाटा मिळाला नसल्याची सेना नेते खंत व्यक्‍त करत होते. गेल्या वेळी शिवसेनला पाच कॅबिनेट तर सात राज्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले होते. आता मात्र भाजपची संख्या घटली असल्याने शिवसेनेसमोर झुकण्याशिवाय भाजपसमोर पर्याय नाही. 

विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेने मुख्यमंत्री आमचाच असेल असे जाहीर केले आहे. किमान उपमुखमंत्रीपद पदरात पाडून घेण्याची शिवसेनेची तयारी होती. यासाठी शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतवले होते. आता गेल्या पाच वर्षातील अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरसावले असून त्यांनी आज भाजपने जमीनीवर राहण्याचा सल्ला दिला आहे. 

सत्तास्थापन करताना सुरूवातीला शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाची मागणी करण्यात येणार असल्याची रणनिती आखल्याचे समजते. शिवसेना-भाजप युतीत ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असे सुरूवातीपासूनचे सूत्र असल्याचे सांगत मुख्यमंत्रीपद सेनेला देण्यात येणार नसल्याचे भाजपने ठरवले आहे. 

त्यामुळे उपमुखमंत्रीपद स्विकारण्यास शिवसेनेला राजी करण्यास भाजप नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर उपमुख्यमंत्रीपदासह मंत्रीमंडळात पन्नास टक्‍के वाटा मागण्याची शिवसेनेन तयारी सुरू केली आहे. तसेच गृह, नगरविकास, गृहनिर्माण महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम अशी कॅबिनेट खाती पदरात पाडून घेण्यास शिवसेना सरसावली आहे. त्यांची मागणी मान्य करणे भाजपसाठी सोपे नसल्याने सार्वजनिक बांधकाम, कृषी, राज्य उत्पादन शुल्क, उर्जा आदि खाती देण्यास भाजप राजी होईल, अशी मनस्थिती भाजपने तयार केल्याचे समजते.
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com