Shivsena will march on crop insurance companies offices on 17 July : Thakare | Sarkarnama

पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयांवर शिवसेनेचा 17 जुलैला मोर्चा : ठाकरे

वैदेही काणेकर
गुरुवार, 11 जुलै 2019

 पंढरपूरला मी जाणारच नव्हतो. माझा तसा कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता. 

-उद्धव ठाकरे

मुंबई : "शेतकऱ्यांची पीकविम्याची प्रकरणे त्वरित निकाली काढावीत या मागणीसाठी येत्या बुधवारी ( ता. 17) शिवसेनेतर्फे मुंबईतील पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा धडकणार आहे," अशी माहिती शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, " शेतकरी अडचणीत आहेत त्यामुळे शिवसेना गप्प बसणार नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक महत्त्वाच्या योजना राबवीत आहे. मात्र विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीत त्यानुसार सुधारणा आणि बदल होणे आवश्‍यक आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मुंबईत आपल्यासाठी कोणी आवाज उठविणारे आहेत, याची जाणीव या मोर्च्याच्या निमित्ताने करून दिली जाणार आहे.'' 

सरकार बदलले असले तरी शासकीय यंत्रणा बदललेली नाही, असे सांगून श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, " शासकीय यंत्रणेतही सुधारणेची आणि बदलाची गरज आहे. शासनाच्या चांगल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवताना काही जण जर झारीतील शुक्राचार्याची भूमिका घेत असतील तर असे शुक्राचार्य दूर करणे आवश्‍यक आहे.'' 

कर्ज थकबाकीसाठी शेतकऱ्यांच्या घरावर जप्तीच्या नोटिसा लावणाऱ्या बॅंकांनी सुद्धा आता सुधारावे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे. अशा शेतकऱ्यांची यादी बॅंकेच्या प्रवेशद्वारावर लावली जावी, अशी सूचनाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. 

मुख्यमंत्र्यांबरोबर आपण पंढरपूरला जाणार नाहीत काय? अशी विचारणा केली असता श्री. ठाकरे म्हणाले, " पंढरपूरला मी जाणारच नव्हतो. माझा तसा कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता. माझे जर काही ठरले असते तर तुम्हाला माहिती दिली असती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख