नीतेश राणेंना भाजपने उमेदवारी दिली तरी शिवसेना विरोधात लढणार ! 

 नीतेश राणेंना भाजपने उमेदवारी दिली तरी शिवसेना विरोधात लढणार ! 

कणकवली: माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे हे आपला स्वाभिमान पक्ष आज (ता. 2) भाजपमध्ये विलीन करणार आहेत. मुंबईत राणेंचा भाजप प्रवेश सोहळा होणार आहे.

यासाठी अनेक कार्यकर्ते कालच मुंबईला रवाना झाले. तर कणकवली मतदारसंघात भाजपतर्फे नीतेश राणे हेच उमेदवार असतील हे देखील जवळपास निश्‍चित झाल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले. 

सिंधुदुर्गातील भाजप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत बैठका झाल्या. या बैठकीत राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचेही ते म्हणाले. 

राणेंच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या गेले अनेक दिवस उठत होत्या; मात्र गांधी जयंतीच्या औचित्यावर प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर सिंधुदुर्गातील राणेंचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर गुरुवारी (ता. 3) राणे आपल्या कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्गात दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

राणेंच्या भाजप प्रवेशामुळे कणकवली मतदारसंघात विद्यमान आमदार नीतेश राणे यांना भाजपकडून उमेदवारी निश्‍चित झाली आहे; तर राणेंच्या विरोधात सतीश सावंत यांना उतरविण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 

राज्यात शिवसेनेची भाजपसोबत युती असेल; पण कणकवली मतदारसंघात जर भाजपकडून राणे उमेदवार असतील तर शिवसेना देखील तेथे उमेदवार उभा करणार असल्याची ठाम भूमिका शिवसेना पक्षाकडून घेण्यात आली आहे. तसे झाल्यास कणकवलीत राणे विरुद्ध सावंत अशी हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. 

संदेश पारकर  अर्ज दाखल करणार 
भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक लढणारच असे जाहीर केले आहे. ते गुरुवारी (ता. 3) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कणकवली मतदारसंघात भाजपकडून आपणालाच उमेदवारी दिली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी आज दिली. 

राणेंच्या प्रवेशामुळे भाजपला बळकटी 
राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असून देखील सिंधुदुर्गात भाजप संघटनेला फारशी ताकद निर्माण करता आलेली नाही. आता राणेंच्या प्रवेशानंतर सिंधुदुर्गात भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल. कणकवली मतदारसंघातूनही भाजपला हक्‍काचा उमेदवार मिळेल. सिंधुदुर्गात भाजपला बळकटी येण्यासाठी राणेंना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com