Shivsena Upset Over Seat Sharing with BJP For Assembly Elections | Sarkarnama

युवासेनेचा आग्रह मोठा; युतीवर 2014चे पुन्हा सावट?

मृणालिनी नानिवडेकर 
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा दोघे भाउ मिळून राज्य करू, अशी संमती देतानाच राज्यात शिवसेनेची ताकद समान असायलाच हवी, असा आग्रह युवासेनेने धरला आहे. 130 पेक्षा एकही जागा कमी घेणे योग्य ठरणार नाही असे प्रशांत किशोर यांचा हवाला देत युवासेना नमूद करत असल्याने गेल्या निवडणुकीप्रमाणेच भाजपला 121 जागा नाकारण्याचा प्रकार पुन्हा घडत युती तुटणार तर नाही ना, या भीतीने सेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

मुंबई : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा दोघे भाउ मिळून राज्य करू, अशी संमती देतानाच राज्यात शिवसेनेची ताकद समान असायलाच हवी, असा आग्रह युवासेनेने धरला आहे. 130 पेक्षा एकही जागा कमी घेणे योग्य ठरणार नाही असे प्रशांत किशोर यांचा हवाला देत युवासेना नमूद करत असल्याने गेल्या निवडणुकीप्रमाणेच भाजपला 121 जागा नाकारण्याचा प्रकार पुन्हा घडत युती तुटणार तर नाही ना, या भीतीने सेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

या वेळी भाजपने 122 पेक्षा जास्त जागा दयायच्या तरी कशा, अशी विचारणा करत लवकर सहकाऱ्यांशी बोलून काय ते ठरवा असे सेनेला कळवले असल्याचे विश्‍वसनीयरित्या समजते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुंबईतील संभाव्य दौरा अंतिम न झाल्याने युतीची घोषणा केंव्हा या शंकेने पछाडलेल्या काही सेनानेत्यांनी मध्यस्थीसाठी भाजपशी संपर्क सुरू ठेवल्याचे समजते. आदित्य यांच्या चमूने सेनेचा लाभ भाजपसमवेत रहाण्यात असल्याचेसमजून घ्यावे यासाठी सेनेतील ज्येष्ठ मंत्री प्रयत्न करीत आहेत. निवडणूक खर्चाचा तपशील उचला असे मंत्र्यांना कळवण्यात आल्याने मंत्रीवर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

भाजपने युती होणारच चा गजर जाहीरपणे सुरू ठेवत प्रत्यक्षात सेनेशी आता स्वत:हून संवाद साधायचा नाही असे ठरवल्याने सध्या युतीच्या आघाडीवर सारे कसे शांत शांत अशी अवस्था आहे.आमची 288 जागांची यादी तयार आहे असे एका भाजपनेत्याने स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकारण सेनेला महत्व देत असल्याची कुजबूज एका गटाने सुरूकेली असून मुंबईत भाजपला शक्‍य असतानाही सेनेला महापौरपदाची संधी दिली ,याहून मित्राला किती सांभाळून घ्यायचे ते एकदाचे ठरवून टाका अशी विचारणाही केली जाते आहे.दिल्लीहून महाराष्ट्रात आलेल्या भूपेंद्र यादव यांच्या चमूने सकाळपासून बैठकांचा मारा लावला होता. भाजपच्या सर्व बडया नेत्यांना या बैठकांना हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

शिवसेनेसाठी सल्लागाराची भूमिका निभावणाऱ्या प्रशांत किशोर यांनी युतीत रहाणे भल्याचे असले तरी प्रत्येक जिल्हयात शिवसेनेला स्थान हवे, असे सांगितले आहे. वातावरण केवळ भाजपच्या नाही तर शिवसेनेच्याही बाजुचे असल्याचे युवासेनेला सांगण्यात येत आहे.आदित्य यांच्या दौऱ्यांना मिळालेला प्रतिसाद फडणवीसांच्या खालोखाल किंवा बरोबरीचा होता असे प्रशांत किशोर यांच्या चमूचे म्हणणे आहे. त्यातच सेना भाजपचे जागावाटप हे भारत-पाकिस्तानची सीमारेषा ठरवण्याएवढेच जिकीरीचे असल्याचे विधान करीत सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राउत यांनी आज बहार उडवून दिली.

युतीत भारत कोण आणि पाकिस्तान कोण असा भाजपत विचारला जात होता. पण त्या संबंधात मौन बाळगा असे पक्षानेच कळवले आहे. युतीची घोषणा करीत प्रचारालाही जाणेआवश्‍यक असल्याचे लक्षात घ्या ,अन काय तो आकडा ठरवून टाका असा दोन्ही पक्षांना वाटते. सेनेतील युवकांची समजूत काढण्याचे काम पक्षप्रमुख उदधव ठाकरे येत्या एक दोन दिवसात करतील असे सांगण्यात येते. आदित्य यांच्या राजकारणप्रवेशाची ही निवडणूक महत्वाची आहे,ती उदधवजी योग्य वळणावर नेतीलअसा विश्‍वास सेनेचे ज्येष्ठ मंत्री व्यक्‍त करीत आहेत. युतीने लढण्याची त्यांची इच्छा आहेच. ती गेल्या वेळेप्रमाणे आकडयांच्या आग्रहात वाहून जावू नये याची जबाबदारी ज्येष्ठनेते उदयोगमंत्री सुभाष देसाईसारख्यांनी घ्यावी, असे त्यांना सांगण्यात येते आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख