Shivsena takes Branch Expansion Program in Baramati | Sarkarnama

शिवसेनेने सुरु केला बारामतीतच शाखाविस्तार

मिलिंद संगई
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर लगेच दुस-याच दिवशी शिवसेनेच्या वतीने बारामती तालुक्यातील मगरवाडी येथे शिवसेना शाखेचे उदघाटन केले गेले. यासह ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डचेही वितरण केले गेले.  बारामतीकरांसोबत हातात हात घालून उध्दव ठाकरे निघालेले असले तरी पक्ष पातळीवर मात्र आपला पक्ष मजबूत करण्याकडेच त्यांचा कल आहे, हेच यातून दिसून आले

बारामती : राज्यात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत जात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. असे असले तरी शिवसेनेने आपली पाळेमुळे ग्रामीण भागातही घट्ट करण्यास पुन्हा एकदा प्रारंभ केला आहे. नवीन युती अस्तित्वात आलेली असली तरी पक्षसंघटना मजबूत करण्याकडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अॅड. राजेंद्र काळे यांनी नव्याने लक्ष दिले आहे. 

राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर लगेच दुस-याच दिवशी शिवसेनेच्या वतीने बारामती तालुक्यातील मगरवाडी येथे शिवसेना शाखेचे उदघाटन केले गेले. यासह ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डचेही वितरण केले गेले.  बारामतीकरांसोबत हातात हात घालून उध्दव ठाकरे निघालेले असले तरी पक्ष पातळीवर मात्र आपला पक्ष मजबूत करण्याकडेच त्यांचा कल आहे, हेच यातून दिसून आले. बारामती तालुक्यातच शिवसेनेचा विस्तार व्हावा, या उद्देशाने ही शाखा व स्मार्ट कार्ड वितरणाचा कार्यक्रम झाला. 

आगामी काळात शिवसेनेच्या आणखी शाखा बारामती मतदारसंघात सुरु करणार असल्याचेही राजेंद्र काळे यांनी नमूद केले.  युतीत सरकार चालवायचे असले तरी आपला पक्ष सक्षम व्हावा व आगामी निवडणूकीत आमदारांची संख्या वाढावी या साठी शिवसेनेने संघटना बांधणीची ही तयारी सुरु केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

शिवसेनेचे संपर्क प्रमुख सत्यवान उभे, अॅड. राजेंद्र काळे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, संजय काळे, जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, भीमराव भोसले, तालुका प्रमुख विश्वास मांढरे, नीलेश मदने, निखिल देवकाते, विवेक साळुंखे, सुदाम गायकवाड, सुभाष वाघ, दत्ता लोणकर, बंटी गायकवाड, कल्याण जाधव, मुरुमचे शाखाप्रमुख संदीप गायकवाड, आदेश काळे, शिवाजी शेंडकर, भगवान गोफणे आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख