Shivsena Supports BJP in Sangli Zilla Parishad Election | Sarkarnama

सांगलीत जिल्हा परिषदेत भाजपला शिवसेनेची साथ; बाबर, घोरपडे समर्थक सदस्यांनी केले उघडपणे मतदान  

अजित झळके
गुरुवार, 2 जानेवारी 2020

जिल्हा परिषदेच्या राजकारणात धर्मसंकटात सापडलेल्या शिवसेना आमदार अनिल बाबर यांनी अखेर भाजपला साथ देण्याचा धाडसी निर्णय घेतला.

सांगली : जिल्हा परिषदेच्या राजकारणात धर्मसंकटात सापडलेल्या शिवसेना आमदार अनिल बाबर यांनी अखेर भाजपला साथ देण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांच्यासह तीन सदस्यांनी आपली मते भाजपच्या पारड्यात टाकली. त्यामुळे भाजपच्या प्राजक्ता कोरे यांनी कॉंग्रेसच्या कलावती गौरगौड यांच्यावर 35 विरुद्ध 22 मतांनी विजय मिळवत भाजपची सत्ता कायम राखली. 

उपाध्यक्षपदाच्या निवडीत कॉंग्रेच्या जितेंद्र पाटील यांचा 35-22 ने पराभव करत भाजपचे शिवाजी डोंगरे उपाध्यक्ष झाले. या निमित्ताने बाबर गटाने विधानसभा निवडणूक भाजपने केलेल्या उपकाराची परतफेड केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जिल्हा परिषदेत आमदार अनिल बाबर काय करणार, याची उत्सुकता ताणली गेली होती. ते मंत्री होतील, अशी चर्चा होती. त्यांना संधी मिळाली नाही. ते नाराज झाले, मात्र त्यांनी पक्षावर ती नाराजी व्यक्त केली नाही. 

जिल्हा परिषदेतही त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीची वाट पाहिली. ते जमले नाही. ना राष्ट्रवादी, ना कॉंग्रेस, ना शिवसेनेकडून त्यांना विचारणा झाली. अखेर जयंत पाटील यांनी अनिल बाबर यांना फोन करून "महाविकास आघाडीचे जमणार नाही, तुमचा निर्णय घ्यायला तुम्हाला मोकळीक आहे'', असे स्पष्ट केले. त्यामुळे बाबर यांची एका मोठ्या धर्मसंकटातून सुटका झाली होती.  आज सकाळपर्यंत सारे ठीक होते. महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, असेच अपेक्षित होते. 

परंतु, सकाळी सुहास बाबर आले आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादीने त्यांना गळ घातली. उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरा, असे आवाहन केले. बाबर यांनी ते फेटाळून लावले. असला प्रकार आम्हाला जमणार नाही, असे बजावले. त्यानंतरही बाबर यांचे टेन्शन वाढलेले होते. कारण, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने अध्यक्ष, उपाध्यक्षपदाला उमेदवार दिला तर मतदान कुणाला करायचे? या संकटातून आमदार बाबर यांनी मार्ग काढला आणि विधानसभेतील भाजपच्या उपकाराची परतफेड केली. 

दुसरीकडे अजितराव घोरपडे यांनीही भाजपसोबत उघडपणे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दोन सदस्यांनी भाजपला मतदान केले. घोरपडे आज दिवसभर भाजप नेत्यांसोबतच होते. त्यामुळे जिल्ह्यात भाजप-शिवसेना एकीने जिल्हा परिषदेची सत्ता राखली हे स्पष्ट झाले. आता पदवाटपात शिवसेनेला काही संधी मिळते का, याकडे लक्ष असेल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख