बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला शिवसेनेला "एनडीए' च्या बाहेर काढले ? 

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळसाहेब ठाकरे यांची "एनडीए' भक्‍कम होती. तिला महाराष्ट्रात तरी यापूर्वी कधी तडा गेली नव्हती. शिवसेनेला "एनडीए'तून बाहेर काढल्यामुळे आता खरा खेळ सुरू होणार आहे. शिवसेना-भाजपतील संघर्ष अधिक पेटलेला दिसेल. शिवसेना बलाढ्य अशा भाजपशी कसा मुकाबला करते तेही पाहावे लागेल.
बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला शिवसेनेला "एनडीए' च्या बाहेर काढले ? 

पुणे : शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अगदी जवळ गेल्यानंतर अवजड खात्याचे मंत्री अरविंद सावंत यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरील आपली निष्ठा सिद्ध केली. त्यावेळीच वाटले होते शिवसेना "एनडीए'तून बाहेर पडेल. त्यानंतर म्हणजे आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी भाजपनेच शिवसेनेला "एनडीए'तून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. 

शिवसेनेला "एनडीए'तून कधी बाहेर काढले याचे विस्मरण कोणाला होणार नाही कारण 17 नोव्हेंबर हा दिवस शिवसेनेसाठी आणि भाजपसाठी आजपर्यंत महत्त्वाचा मानण्यात आला आहे. बाळासाहेबांनी याच दिवशी अखेरचा श्‍वास घेतला होता. याचा धक्का शिवसेनेसह साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला बसला होता. यापूर्वी म्हणजे बाळासाहेब हयात असताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर जनसागर लोटत असे. कोणत्याही पक्षाचे सरकार असो पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री असो विरोधक असोत साहेबांना भरभरून शुभेच्छा दिल्या नाही असे कधीच झाले नाही. 

बाळासाहेबांच्या निधनानंतर म्हणजेच गेल्या सात वर्षापासून शिवतिर्थावर 17 नोव्हेबरला मोठी गर्दी होत असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेली पाच वर्षे सत्तेवर होते ते याच दिवशी तेथे जात. खुद्द उद्धव ठाकरेही त्यांच्या स्वागताला उपस्थित असत. आज ते मुख्यमंत्री नाहीत. शिवसेना-भाजपमध्ये अंतर पडले आहे. युती तुटली आहे. शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात गेली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांचे तोंडही पाहण्यास तयार नाहीत की काय असे चित्र आज शिवतीर्थावर पाहण्यास मिळाले. 

शिवसैनिकांचा सर्वाधिक रोष फडणवीस यांच्यावर असल्याचे दिसून येत आहे. त्याचा अनुभवही आज आला. शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. फडणवीस काहीही न बोलता निघून गेले खरे. मात्र शिवसेना नेत्यांनी शिवसैनिकांना आवरायला हवे होते. कोणी जर अभिवादन करण्यासाठी येत असेल तर त्याचा अवमान करणे योग्य नव्हते. सत्ता येईल जाईल पण, बाळासाहेब असे व्यक्तिमत्व होते की ते सर्वांचेच आदराचे स्थान होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 

शिवतीर्थावर हे सर्व घडत असताना तिकडे दिल्लीत भाजपने "एनडीए' तून शिवसेनेला बाहेर काढले. तुमची आम्हाला आता गरज नाही. तुमचे तुम्ही पहा आम्ही समर्थ आहोत असा इशाराही अप्रत्यक्ष दिला. बाळासाहेबांच्या पुण्यतिथीदिनी शिवसेना प्रथमच बाहेर पडली तीही पंचवीस तीस वर्षांनी. आजपर्यंत दोन्ही पक्षात मतभेद होऊनही या दोन्ही पक्षानी कधीच काडीमोड घेतली नव्हती. 

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळसाहेब ठाकरे यांची "एनडीए' भक्‍कम होती. तिला महाराष्ट्रात तरी यापूर्वी कधी तडा गेली नव्हती. शिवसेनेला "एनडीए'तून बाहेर काढल्यामुळे आता खरा खेळ सुरू होणार आहे. शिवसेना-भाजपतील संघर्ष अधिक पेटलेला दिसेल. शिवसेना बलाढ्य अशा भाजपशी कसा मुकाबला करते तेही पाहावे लागेल. भविष्यात जे काही व्हायचे आहे ते होईल पण, शिवसेनेला "एनडीए'तून कधी बाहेर काढले याचे उत्तर कोणाला देणे सोपे जाणार आहे.त्यासाठी इतिहासाची पाने चाळावी लागणार नाहीत हे मात्र खरे ! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com