शिवसेनेच्या पुणे शहरप्रमुख पदासाठी आणखी महिनाभर प्रतिक्षा 

शिवसेनेच्या पुणे शहरप्रमुख पदासाठी आणखी महिनाभर प्रतिक्षा 

पुणे : शिवसेनेचा नवा पुणे शहरप्रमुख कोण होणार याचे आडाखे शिवसैनिक गेले महिनाभरापासून बांधत आहेत. मात्र नाव जाहीर होण्यास आणखी किमान एक महिना लागणार असल्याने शिवसैनिकांना सध्या "वेट ऍण्ड वॉच'च्या भूमिकेत राहावे लागणार आहे.

 
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर नव्या शहरप्रमुखांची घोषणा होणार होती. मात्र गणेशोत्सवामुळे हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे पुण्याच्या पदाधिकाऱ्यांना या महिनाअखेर वेळ देणार आहेत. त्यानंतर नव्या शहरप्रमुखांची निवड होईल, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. 

विद्यमान शहराध्यक्ष विनायक निम्हण यांच्या जागेवर ही निवड करण्यात येणार आहे. संघटनेच्या रचनेत करण्यात आलेल्या बदलानुसार पुणे जिल्ह्याचा समावेश उत्तर महाराष्ट्र विभागात करण्यात आला आहे. खासदार राऊत यांना या विभागाचे विभागीय नेते करण्यात आले आहे. या विभागातील मावळ, शिरूर व बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी खासदार राऊत यांच्याकडे तर फक्त पुणे शहराची जबाबदारी आमदार उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे. 

नव्या रचनेत नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची पक्षाची भूमिका आहे. त्या दृष्टीने संपर्क नेते सामंत शिवसैनिकांच्या संपर्कात आहेत. शहराध्यक्षपदासाठी दोन माजी आमदारांची नावे आघाडीवर आहेत. कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व हडपसरचे माजी आमदर महादेव बाबर हे ते दोन माजी आमदार आहेत. बाबर यांनी मतदारसंघात चांगले काम असून मोकाटे यांनी कोथरूड मतदारसंघाबरोबरच पुण्याचे उपमहापौर म्हणून पूर्वी काम केले आहे. 

या दोघांशिवाय धक्कातंत्राचा भाग म्हणून ठाकरे यांच्याकडून एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. पक्ष संघटनेत महत्वाची पदे देताना नव्या तरूण चेहऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाऊ शकतो, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. मात्र, नव्या संधी देताना जुन्या-जाणत्यांना डावलण्याची भूमिका ठाकरे कधी घेत नाहीत, असा सूर लावला जात आहे. त्यामुळे शहराध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे महत्वाचे ठरणार आहे. नव्या अध्यक्षांकडे येणारी लोकसभा व विधासभा निवडणुकांची जबाबदारी राहणार असल्याने या बाबत विचारपूर्वक निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com