बीडमध्ये जनावरांच्या छावणीत गोलमाल : तपासणीस आलेल्या अधिकाऱ्याला सेना जिल्हाप्रमुखाने रोखले

बीडमध्ये जनावरांच्या छावणीत गोलमाल : तपासणीस आलेल्या अधिकाऱ्याला सेना जिल्हाप्रमुखाने रोखले

बीड : शेतकऱ्यांचा पुळका दाखवत चारा छावण्यांसाठी ओरड करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी छावण्यांमधून जनावरांचे पोट भरण्यापेक्षा स्वत:चे खिशे भरण्याचेच नियोजन केल्याचे जिल्ह्यात समोर येत आहे. राज्यात सर्वाधिक ६०० चारा छावण्या असलेल्या जिल्ह्यात छावणी चालकांची पशुमालकांसोबत तर मुजोरी आहेच. पण, अगदी दंडाधिकारीय अधिकार असलेल्या उपविभागीय अधिकऱ्यांनाही या मुजोरीचा प्रत्यय आला.

परिसरातील कोल्हारवाडीत छावणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना चारा छावणी तपासणीपासून तब्बल तासभर रोखले. छावणी तपासणी होऊन काळंबेर उघड होऊ नये म्हणून विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला. छावणी चालकाच्या या मुजोरीनंतर पोलिस बंदोबस्त बोलावून छावणीची तपासणी झाली असली तरी या मुजोरीवर कार्यवाही काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

जिल्ह्यातील चारा छावण्यांत चार लाखांवर जनावरे आहेत. कागदोपत्री काळंबेर करुन संख्या वाढविण्याचा प्रताप छावणी चालकांनी सुरु केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी गुरुवारी पाच उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत सर्वाधिक चारा छावण्या असलेल्या बीड आणि आष्टी तालुक्यांत तपासणी लावली. उपविभागीय अधिकारी शोभा जाधव या कोल्हारवाडी येथील ‘मत्स्यगंधा’ सेवाभावी संस्थेमार्फत चालविली जात असलेल्या चारा छावणीच्या तपासणीला सायंकाळी पोचल्या. 

छावणी तपासल्यानंतर जनावरांची खरी संख्या समोर येर्ईल म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेसह इतरांनी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना तब्बल तासभर छावणी तपासण्यापासून रोखले. विशेष म्हणजे छावणीची तपासणी होऊ नये यासाठी तेथील विद्युत पुरवठा तोडण्यात आला. या संदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे व रपोलिस उपअधिक्षकांसह मोठा फौजफाटा छावणीवर पाठविला. पोलिस बंदोबस्तात बॅटरी आणि मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात उशिरापर्यंत छावणीची तपासणी करण्यात आली. दंडाधिकारीय अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांबाबत असा प्रकार घडत असताना प्रशासन आता काय, भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. 

रात्रीतून साडेसातशे जनावरे कमी होण्याचा चमत्कार

दरम्यान, ता. तीन मार्चला कोल्हारवाडीत सुरु झालेल्या चारा छावणीतील जनावरांचा आकडा ता. ३० व ३१ मार्चला १६१२ वर पोचला. पण, ता. एक एप्रिल रोजी सकाळीच, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी छावणीला भेट दिली आणि त्यादिवशी जनावरांची संख्या ८७१ इतकी नोंदविण्यात आली. रात्रीतून ७४१ जनावरे कमी होण्याचा चमत्कारही याच छावणीत घडला आहे. दरम्यान, जनावरे छावणीत आहेत कि फक्त नोंदवहीत असा प्रश्न असून याला पाठीशी घालणारी महसूल विभागातील साखळीही कार्यरत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. विशेष म्हणजे, या एकट्या मत्सगंधा संस्थेला १५ चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. 

दुसरा चमत्कार : जनावरे आले कुठून

पशुगणनेनुसार बीड तालुक्यातील लहान मोठ्या जनावरांची संख्या एक लाख १६ हजार आहे. तर छावणीतील जनावरांचा आकडा एक लाख २७ हजार आहे. पशुधनापेक्षा छावणीतील जनावरांची संख्या १२ हजार आहे. त्यातच परिसरातील दुध उत्पादक गावांतील जनावरे शेतकऱ्यांनी स्वत:च्या दावणीलाच बांधलेली आहेत. तरीही असे आकडे फुगलेले आहेतच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com