shivsena in mumbai | Sarkarnama

शिवसेना नेत्यांचा भाजपकडे तर सैनिकांचा कॉंग्रेसकडे कल

शाम देऊलकर
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

शिवसेनेचे नेते, मंत्री उघडपणे काही बोलत नसले तरी या सर्वांचा सुप्त कल भाजपबरोबर युती करण्याचा असल्याचे समजते. खासदार संजय राऊतांसारखे नेते सोडले तर या विषयावर कोणीही उघड बोलायला उत्सुक नसल्याचे दिसून येतेय.

मुंबई ः मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या पडद्यामागील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. महापालिकेत सर्वांत जास्त सदस्य निवडून आलेल्या शिवसेनेत मात्र महापौरपदासाठी पाठिंबा कुणाचा घ्यायचा यावरून नेते व शिवसैनिकांमध्ये मतांचे दोन तट पडले आहेत. महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा जुळवून घ्यावे असे सेनानेत्यांचे तर कॉंग्रेसही चालेल परंतु काही झाले तरी भाजप नको असे तीव्र मत शिवसैनिक ठिकठिकाणच्या व्यासपीठावर व्यक्त करत आहेत. 

मुंबईचा महापौर कोण होणार, भाजप-सेनेची पुन्हा युती होणार का, का सेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी साटेलोटे करून शहराचे प्रथम नागरिकपद मिळवणार याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. यावेळच्या पालिका निवडणुकीत पंचवीस वर्षे मित्र राहिलेल्या शिवसेना व भाजप या पक्षांमध्येच घनघोर राजकीय युद्ध झाले आणि या दोन्ही पक्षांनी मिळून तब्बल 166 जागा मिळवल्या. दोन्ही पक्षांचे संख्याबळ गतवेळेपेक्षा वाढले असले तरी या घनघोर युद्धातील शाब्दिक हल्ल्यांमुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मनाने कोसो दूर गेले. शिवसेनेनेदेखील भाजपवर जबर हल्ला केला असला तरी भाजपने शिवसेना व पक्षप्रमुखांवर केलेले हल्ले मुंबईकर शिवसैनिकांच्या वर्मी लागले. यामुळेच आता निकालानंतर काही झाले तरी भाजपवाल्यांची मदत नको असा सुर शिवसैनिकांकडून थेट व्यक्त होऊ लागला आहे. अगदी महापालिकेतील व राज्यातीलही सत्ता गेली तरी चालेल पण "त्यां'चा संग नको, अशी भावना सैनिकांनी पक्षप्रमुखांकडेही लावून धरल्याचे सांगितले जात आहे. 

इकडे शिवसेनेचे नेते, मंत्री उघडपणे काही बोलत नसले तरी या सर्वांचा सुप्त कल भाजपबरोबर युती करण्याचा असल्याचे समजते. खासदार संजय राऊतांसारखे नेते सोडले तर या विषयावर कोणीही उघड बोलायला उत्सुक नसल्याचे दिसून येतेय. सत्तेचे फायदे घेण्याची झालेली सवय असो, वा भाजपकडून कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जाण्याची भीती असो या कारणांमुळे समस्त सेना नेत्यांनी याबाबत चुप्पी धरल्याचे म्हटले जात आहे. या दोन मतप्रवाहांमुळे ही कोंडी फोडायची कशी, अशी सेना पक्षप्रमुखांची मोठी कुचंबणा झाली आहे. 

पक्ष प्रमुखांचा आदेश अंतिम - भोसले 
शिवसेनेत पक्षप्रमुखांचा आदेश हा अंतिम असतो. आमच्या पक्षात नेते असले तरी ते पहिल्यांदा शिवसैनिकच असतात, त्यामुळे आमच्या पक्षात अजिबात दोन प्रवाह वगैरे नाहीयेत. पक्षप्रमुख सांगतील त्याप्रमाणेच नेते व सैनिक आदेशाची अंमलबजावणी करतील अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी व्यक्त केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख